Join us

Onion Market Update : शेतकरी संतप्त; 'या' कारणास्तव उमराणेत कांदा लिलाव पाडले बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 13:00 IST

Onion Market Update : उमराणे येथील स्व. निवृत्ती काका देवरे कृषी उत्पन्न बाजार समितीत काल बुधवार (दि. १८) रोजी सकाळच्या सत्रातील कांद्याचे लिलाव सुरू होताच काल निघालेल्या बाजारभावाच्या तुलनेत निम्म्याहून अधिक दराने कांदा पुकारल्याने संतप्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी सुमारे अर्धा तास लिलाव बंद पाडला होता.

नाशिक जिल्ह्यातील उमराणे येथील स्व. निवृत्ती काका देवरे कृषी उत्पन्न बाजार समितीत काल बुधवार (दि. १८) रोजी सकाळच्या सत्रातील कांद्याचे लिलाव सुरू होताच काल निघालेल्या बाजारभावाच्या तुलनेत निम्म्याहून अधिक दराने कांदा पुकारल्याने संतप्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी सुमारे अर्धा तास लिलाव बंद पाडला होता. त्यानंतर बाजार समितीत प्रशासनाने मध्यस्थी केल्याने लिलाव पूर्ववत सुरू झाले.

गेल्या महिनाभरापासून लाल कांद्याची आवक वाढली असतानाच गेल्या आठ दिवसांपासून कांदा दरात मोठी घसरण सुरू झाली आहे. असे असतानाच मंगळवारी निघालेल्या बाजारभावाच्या तुलनेत बुधवारी (दि. १८) सकाळच्या सत्रातील लिलाव सुरू झाले असता, व्यापारी बांधवांनी खूपच कमी दर पुकारला. त्यामुळे संतप्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी बाजारभाव का कमी झाले, याबाबत विचारणा करत सुमारे अर्धा तास लिलाव बंद पाडले.

लिलाव बंद पडताच बाजार समिती प्रशासनाने शेतकऱ्यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, शेतकरी ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. मात्र, समितीचे सचिव नितीन जाधव व सहायक सचिव तुषार गायकवाड यांनी शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी शासनाकडे निर्यात शुल्क शून्य करण्याबाबत समितीच्या वतीने लेखी पत्रव्यवहार करणार असल्याचे सांगितल्यानंतर लिलाव पूर्ववत सुरू करण्यात आले.

दरम्यान काल सरासरी ३,२०० रुपये प्रतिक्विंटल बाजारभाव मिळाला होता, त्याच कांद्याना आज बाजारात २१०० रुपये बाजारभाव मिळाला असून, सरासरी दरात मोठी घसरण झाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे शासनाने तात्काळ निर्यात शुल्क शून्य करावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे.

 किमानकमालसरासरी
१७ डिसेंबरचा दर१००० ४०७१३२००
१८ डिसेंबरचा दर५०० २६०० २१०० 

मनमाडला घसरण...

मनमाड बाजार समितीत आजही कांद्याच्या भावात घसरण झाल्याचे दिसून आले. कांद्याला मिळालेला किमान भाव ४०० रुपये प्रति क्विंटल इतका होता. कमाल २३०० रुपये प्रति क्विंटल इतका प्राप्त झाला. सरासरी भाव दोन हजार रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला. गेल्या १० ते १५ दिवसांपासून हे चित्र आहे.

हेही वाचा : Health Benefits Of Tomato : नियमित खा गुणकारी टोमॅटो; सदृढ आरोग्याला होतील अनेक फायदे

टॅग्स :शेती क्षेत्रबाजारमार्केट यार्डशेतकरीकांदानाशिक