Onion Market : लासूर स्टेशन येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात लाल कांद्याची आवक वाढल्याने ९ डिसेंबर रोजी ४ हजार ८५० रुपये क्विंटल भावाने विकलेला कांदा काल (१४ डिसेंबर) रोजी ३ हजार १९० रुपयांनी विकला गेला.
६ दिवसांमध्ये प्रतिक्विंटल तब्बल १ हजार ६०० रुपयांनी कांद्याचे भाव गडगडल्याने शेतकरी अस्वस्थ झाले आहेत. लासूर स्टेशन येथील बाजार समितीच्या कांदा मार्केटमध्ये मोकळा कांदा लिलाव सुरू आहे.
जिल्ह्यातील विविध भागांतून, तसेच वैजापूर तालुक्यातील लाल कांदा उत्पादक शेतकरी लासूर स्टेशन येथील मार्केटमध्ये कांदा विक्रीसाठी आणत आहेत. यामुळे कांद्याची आवक वाढली आहे. त्यामुळे कांद्याच्या दरात कमालीची घसरण झाली आहे.
शनिवारी कांद्याला सर्वोच्च दर ३ हजार १९० रुपये प्रतिक्विंटल मिळाला. हाच दर ९ डिसेंबर रोजी ४ हजार ८५० रुपये होता. शनिवारी दिवसभर ६२५ वाहने लिलावासाठी बाजार समितीमध्ये दाखल झाली होती. शेतकरी मोठ्या आशेने कांदा आणत असताना चांगला भाव मिळत नसल्याने ते नाराज झाले.
९ डिसेंबर रोजीचे लाल कांद्याचे दर
सर्वात कमी भाव | सर्वात जास्त भाव | सरासरी भाव | लिलाव झालेली एकूण वाहने |
८५० रूपये क्विंटल | ४८५० रूपये क्विंटल | ३९१० रूपये क्विंटल | ४९३ |
१४ डिसेंबर रोजीचे लाल कांद्याचे दर
सर्वात कमी भाव | सर्वात जास्त भाव | सरासरी भाव | लिलाव झालेली एकूण वाहने |
५४५ रूपये क्विंटल | ३१९० रूपये क्विंटल | २१६० रूपये क्विंटल | ६२५ |
लागवडीसाठी केलेला खर्चही निघेना
• बदलत्या वातावरणामुळे लाल कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले असून एकरी ८० ते १०० क्विंटल होणारा कांदा आता एकरी ३५ ते ४० क्विंटल होत आहे.
• यासाठी रोप, बियाणे, खत, कीटकनाशक, मजुरी आदी खर्च एकरी ४० ते ५० हजार रुपये येतो; मात्र आता कमी भाव मिळत असल्याने केलेला खर्चही निघत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. शासनाने याची दखल घेऊन लाल कांद्याला योग्य भाव द्यावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.