कापसाचा पहिला वेचा अधिक वजनदार असतो. मात्र, दुसऱ्या वेळचा वेचा त्या तुलनेत हलका असतो. यामुळे कापसाची गुणवत्ता कमी होते. याच प्रमुख कारणाला पुढे करीत हमी केंद्रावर कापूस खरेदीचा दुसरा ग्रेड सोमवारपासून सुरू करण्यात आला आहे.
पूर्वी आठ हजार ११० रुपये क्विंटल दराने खरेदी होणारा कापूस आता आठ हजार १० रुपये क्विंटल दराने खरेदी होणार आहे. कापूस खरेदी करताना कापसातील ओलावा आठ टक्के असेल तर मिळणारा हमी दर पूर्णतः दिला जातो.
मात्र, त्यापेक्षा जास्त ओलावा असेल तर त्यामध्ये आठ ते १२ टक्के यामध्ये प्रत्येक टक्क्याला दरात कपात करण्याच्या सूचना आहेत. यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्याला आता नव्या नियमावलीचाही फटका बसणार आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील १७ हमी केंद्रांवर एक लाख शेतकऱ्यांनी नोंदणी केली. त्यापैकी ६० हजार शेतकऱ्यांना कापूस विक्रीसाठी मंजुरी मिळाली. यातील काही मोजक्याच शेतकऱ्यांना कापसाची विक्री करता आली. अजूनही शेकडो शेतकरी कापूस विक्रीच्या प्रतीक्षेत आहेत.
अडीच लाख क्विंटल कापसाची खरेदी
जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी १७ केंद्रांवर अडीच लाख क्विंटल कापसाची विक्री केली आहे. अजूनही अनेक शेतकऱ्यांकडे कापूस पडून आहे. सीसीआयकडून मंजुरी मिळाली नाही. याशिवाय स्लॉट बुकिंग झाली नाही. म्हणून अनेकांना केंद्रावर कापूसच नेता आला नाही. अशा परिस्थितीत चांगल्या प्रतीचा कापूसही शेतकऱ्यांच्या घरात पडून आहे. यामुळे त्याला कापूस खरेदीची दुसरी ग्रेड मिळाली तर त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागणार आहे.
पहिलाच ग्रेड कायम ठेवा
ज्या शेतकऱ्यांना कापूस विकता आला नाही अशा शेतकऱ्यांना चांगला प्रतीचा कापूस असतानाही दुसरा ग्रेड मिळाला, तर क्विंटलमागे १०० रुपयांचे नुकसान सहन करावे लागणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना पूर्वीचाच ग्रेड मिळावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
