उन्हाळा म्हणजे फळबागायतदारांसाठी आशेचा ऋतू, विशेषतः कलिंगड उत्पादकांसाठी हा हंगाम 'कमाईचा मोसम' मानला जातो.
यंदा तर उन्हाळ्याच्या प्रारंभीच रमजान महिन्याची साथ मिळाल्याने शेतकऱ्यांच्या अपेक्षा अधिकच उंचावल्या होत्या.
देशांतर्गत मागणीबरोबर आखाती देशांतून होणारी निर्यात यामुळे 'बळीराजा'ला चांगला भाव मिळेल, अशी आशा निर्माण झाली होती.
मात्र, आंतरराष्ट्रीय पातळीवरील तणाव आणि त्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीने या आशेवर पाणी फिरले.
इराण-इस्रायल संघर्षामुळे आखाती बाजारपेठा डळमळीत झाल्या आणि भारतीय कलिंगडांची निर्यात जवळपास ठप्प झाली.
परिणामी, निर्यातीसाठी राखून ठेवलेला मोठा साठा देशांतर्गत बाजारपेठेत उतरला. पुरवठा वाढला, पण मागणी त्या प्रमाणात वाढली नाही. परिणामी, दर घसरले.
जानेवारी-फेब्रुवारीत १५ ते ३० रुपये किलोने विकले जाणारे कलिंगड ९ ते १५ रुपयांवर आले. उत्पादन खर्चाच्या तुलनेत हा दर शेतकऱ्यांसाठी तोट्याचा ठरत आहे.
उन्हाचा तडाखा वाढत असल्याने मे महिन्यात भाव पुन्हा वाढतील, अशी आशा निर्माण होत असतानाच आणखी एक संकट कोसळले विषबाधेच्या अफवांचे.
मुंबईत एका कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याची घटना आणि त्याचा संबंध कलिंगडाशी जोडणाऱ्या अफवांनी बाजारात भीतीचे वातावरण निर्माण केले.
परिणामी, काही ठिकाणी कलिंगडांची विक्रीच ठप्प झाली, तर ग्राहकांनीही या फळाकडे पाठ फिरविण्यास सुरुवात केली.
अशा अफतांचे सर्वाधिक दुष्परिणाम शेतकऱ्यांवर होतात; कारण त्यांच्याकडे साठवणुकीची सुविधा मर्यादित असते. उत्पादन नाशवंत असल्याने तत्काळ विक्री करणे भाग पडते.
अशा वेळी दर घसरले, तर थेट आर्थिक फटका बसतो. आधी निर्यातबंदी आणि आता अफवा या दुहेरी संकटाने कलिंगड उत्पादकांचे कंबरडे मोडण्याची वेळ आली आहे.
वास्तविक, कलिंगड हे आरोग्यासाठी लाभदायक फळ आहे. शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यास ते उपयुक्त ठरते.
वैद्यकीय तज्ज्ञांनीही स्पष्ट केले आहे की, योग्यरीत्या साठविलेले आणि स्वच्छतेने कापलेले कलिंगड खाल्ल्याने मृत्यू होण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवण्यापेक्षा वैज्ञानिक माहितीवर आधारित निर्णय घेणे गरजेचे आहे.
शासन, प्रशासनाची भूमिका महत्त्वाची◼️ या पार्श्वभूमीवर शासनाची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते. केवळ बाजारावर सोडून देणे पुरेसे ठरणार नाही.◼️ अफवांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने तातडीने पुढाकार घेणे आवश्यक आहे.◼️ जनजागृती मोहीम, तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि बाजार स्थिर ठेवण्यासाठी हस्तक्षेप या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा देणे गरजेचे आहे.◼️ लोकप्रतिनिधींनीही पुढे येत कलिंगडविषयी सकारात्मक संदेश दिला पाहिजे, शेतकरी हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे, हे आपण वारंवार म्हणतो.◼️ परंतु, अशा संकटकाळात त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे हेच खरे कर्तव्य आहे. अन्यथा, अफवांच्या या वणव्यात केवळ कलिंगडच नव्हे, तर शेतकऱ्यांच्या आशाही भस्मसात व्हायला वेळ लागणार नाही.
- नामदेव मोरेउपमुख्य उपसंपादक
अधिक वाचा: राज्यात 'या' चार ठिकाणी होणार खासगी पशुवैद्यकीय महाविद्यालये; केंद्र शासनाची मान्यता आली
Web Summary : Watermelon farmers face ruin due to export disruptions and poisoning rumors. Prices plummet, devastating livelihoods. Urgent government action, public awareness needed to support farmers.
Web Summary : निर्यात बाधाओं और जहर की अफवाहों से तरबूज किसान संकट में हैं। कीमतें गिरीं, जिससे आजीविका तबाह हो गई। किसानों का समर्थन करने के लिए तत्काल सरकारी कार्रवाई ज़रूरी है।