विनायक चाकुरे
मृगात पेरणी केलेल्या खरिपातील मुगाच्या राशीला सुरुवात झाली आहे. रविवारी लातूर जिल्ह्याच्या उदगीर येथील बाजारपेठेत नवीन मुगाची ३०० कट्टे आवक झाली होती. पावसाने उघडीप दिल्याने आता मुगाच्या राशीला वेग येणार आहे.
दरम्यान हरभरा व तुरीच्या घरात कमालीची घसरण झाली आहे. तसेच सोयाबीनचे दरही गडगडले आहेत. त्यामुळे सणासुदीच्या काळात ग्राहकांना कमी दरात डाळी व खाद्यतेल उपलब्ध होईल, अशी आशा आहे.
मोंढ्यात नवीन मुगाचा श्रीगणेशा...
तालुक्यात मुगाचे क्षेत्र कमी आहे. परंतु, येथील बाजारात शेजारील कर्नाटक, तेलंगणातील शेतकऱ्यांचा शेतीमाल मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी येतो. रविवारी येथील मार्केट यार्ड नवीन मुगाची तीनशे कट्टे आवक झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. परवा झालेल्या पावसामुळे मुगाचा दर्जा खालावला आहे. तसेच ओलावाही मोठ्या प्रमाणात असल्याने शेतमालाच्या दर्जानुसार ४ हजार ५०० ते ७ हजार प्रति क्विंटलप्रमाणे दर मिळत आहे.
तूरडाळीला मागणी नसल्याने दर घसरले...
मागील दोन महिन्यांपासून तुरीचे दर दिवसेंदिवस घसरत आहेत. तुरीच्या डाळीला मागणी कमी झाल्याने दरात घसरण चालू आहे. उदगीर शहर व परिसरात निर्माण होणाऱ्या, तूरडाळीला देशाच्या कानाकोपऱ्यांतून मोठ्या प्रमाणात मागणी असते. परंतु, ७ हजार २०० रुपये असलेला दर आता ६ हजार ७०० रुपयांपर्यंत खाली उतरला आहे. परिणामी या भागातील कारखानदारांची कोंडी झाली आहे.
हरभरा, सोयाबीनच्या दरात मोठी घसरण...
• मागील पंधरवड्यात हरभरा ६ हजार ६०० रुपये, तर सोयाबीन ४ हजार ८०० रुपये प्रति क्विंटल दराने विक्री होत होता. त्यामुळे डाळी व खाद्यतेलाच्या दरात वाढ झाली होती. परंतु, मागील आठवड्यापासून हरभरा व सोयाबीनच्या दरात मोठी घसरण झाली आहे.
• हरभरा व सोयाबीनमध्ये प्रत्येक जवळपास ३०० रुपयांची घसरण झाली आहे. येत्या चार दिवसांपासून सणासुदीस सुरुवात होणार आहे. त्याअगोदर दर घसरल्याने नागरिकांना कमी दरात हरभरा डाळ व सोयाबीन खाद्यद्यतेल उपलब्ध होईल, अशी शक्यता व्यापारी वर्तवित आहेत.
• सध्या उदगीरच्या बाजारपेठेत सोयाबीनची जेमतेम आवक होत आहे. तसेच भावही कमी झाले आहेत. महिनाभरानंतर नवीन सोयाबीनची आवक होण्यास सुरुवात होण्याची आशा आहे.
बाजारपेठेत मुगाला मागणीही अधिक...
नवीन मुगाची आवक होत असून मागणीही चांगली असल्याचे पहावयास मिळत आहे. मात्र, ओलावा आणि डागीपणामुळे दरात फारशी वाढ झाली नसल्याचे दिसून येत आहे. आगामी काळात दर वाढण्याची आशा आहे.
सध्या जुन्या सोयाबीनची आवक जेमतेम दोन ते तीन हजार क्विंटल होत आहे. मूग वेचणीसाठी वातावरण चांगले असून, येत्या काही दिवसांत मुगाची आवक वाढू शकते. त्यानंतर नवीन सोयाबीनच्या हंगामाला सुरुवात होईल. - प्रणव बागडी, आडत व्यापारी, उदगीर.
८ हजार ७६८ रुपये मुगाला शासनाचा हमीभाव...
शासनाने मुगाला ८ हजार ७६८ हमीभाव जाहीर केला असला तरी सध्या ओलावा व डागीचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे हमीभाव मिळत नाही. पावसाने उघडीप दिल्यास पुढील पंधरा दिवसांत मुगाची आवक वाढेल व दरही चांगला मिळेल, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.
कृषी पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील आजचे सोमवार (दि.२५) मुगाचे दर
बाजार समिती | जात/प्रत | परिमाण | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|---|---|
25/08/2025 | ||||||
कारंजा | --- | क्विंटल | 10 | 6975 | 7100 | 6975 |
कर्जत (अहमहदनगर) | --- | क्विंटल | 2 | 7500 | 7500 | 7500 |
पुणे | हिरवा | क्विंटल | 39 | 9000 | 9600 | 9300 |
मालेगाव | हिरवा | क्विंटल | 50 | 4370 | 8765 | 8760 |
शेवगाव - भोदेगाव | हिरवा | क्विंटल | 13 | 6000 | 6750 | 6000 |
मुरुम | हिरवा | क्विंटल | 75 | 6901 | 11300 | 11300 |
तुळजापूर | हिरवा | क्विंटल | 55 | 6500 | 8300 | 8100 |
उमरगा | हिरवा | क्विंटल | 36 | 4850 | 8400 | 7500 |
अमरावती | मोगली | क्विंटल | 1 | 6500 | 7000 | 6750 |