संजय लव्हाडे
नवीन तूरबाजारात आली असून दर मात्र मागील वर्षीच्या तुलनेत कमी आहेत. शेंगदाणा, मका, सरकी, सरकी ढेप महागले आहेत. सोने-चांदीच्या दरात तेजीची घोडदौड कायम असली तरी गृहकर्ज आणि वाहन कर्ज स्वस्त झाल्यामुळे सामान्य ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.
भारतीय रिडार्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये ०.२५ टक्के इतकी कपात केल्यामुळे गृह कर्ज आणि वाहन कर्ज स्वस्त झाले आहे. सध्या काही आघाडीच्या राष्ट्रीयीकृत बँकांचा गृह कर्जाचा व्याजदर ७.३५ टक्के इतका आहे.
रेपो रेट घसरल्यानंतर गृह कर्जाचा हा व्याजदर ७.१० टक्क्यांपर्यंत येऊ शकतो. एखाद्या ग्राहकाने १ कोटी रुपये गृह कर्ज घेतलेले असेल तर ०.२५ टक्के इतका व्याजदर कमी झाल्यानंतर त्याच्या मासिक हप्त्यामध्ये १४४० रुपयांची बचत होऊ शकते.
व्याजदर कमी झाल्यामुळे गृह कर्ज आणि वाहन कर्जाचे प्रमाण वाढेल, असा अंदाज आर्थिक सल्लागार राजेश खिस्ते यांनी व्यक्त केला. अतिवृष्टीमुळे यंदा शेंगदाण्याचे उत्पादन घसरले आहे. त्या तुलनेत मागणी जास्त असल्यामुळे शेंगदाण्याचे दर क्विंटलमागे ५०० ते ७०० रुपयांनी वाढले.
जालना बाजारपेठेत शेंगदाण्याचे दर १० हजार ते १२ हजार २०० रुपये प्रति क्विंटल असे आहेत. मक्याला मोठी मागणी असल्यामुळे दरात तेजी आली असून दर १३०० ते २००० रुपये प्रतिक्विंटल असे आहेत, सरकीची निर्यात सुरू झाल्यामुळे सरकी आणि सरकी ढेपच्या दरात अचानक तेजी आली.
.....असे आहेत बाजारभाव
गहू - २४०० ते ५०००
ज्वारी - २००० ते ३९००
बाजरी - २२०० ते ३१७५
मक - १३०० ते २०११
नवी तूर - ५००० ते ६२००
हरभरा - ४२५० ते ५०००
उडीद - ४००० ते ६५००
सोयाबीन - ३७०० ते ५२००
गूळ - ३१०० ते ४५००
६० पोत्यांची आवक
नवीन तुरीचे बाजारात आगमन झाले असून शनिवारी जालना मोंढ्यात ६० पोत्यांची आवक झाली. व्यापाऱ्यांनी नवीन तुरीचे विधिवत पूजन केले. यंदा तुरीची उत्पादन चांगले आहे. जालना बाजारपेठेत तुरीचे दर ५००० ते ६२०० रुपये प्रतिक्विंटल असे आहेत.
सोन्याच्या दरातील घोडदौड सुरूच
• सध्या लग्नसराई सुरू असल्यामुळे सोने, चांदीला मोठी मागणी आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये कपात केल्यानंतर सोने-चांदीच्या दरात आणखी तेजी आली.
• गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात चढ-उतार पाहायला मिळत असले तरी सोन्याच्या दरातील तेजी घोडदौड कायम आहे.
• गुंतवणूकदारांनी सोन्याकडे आपला कल वळवला आहे. परिणामी सोन्याचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे.
• औद्योगिक उत्पादने तसेच सौर ऊर्जा उपकरणांसाठी मागणी मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे चांदीच्या दरात देखील तेजी येण्याची शक्यता असल्याचे बोलले जाते.
• जालना बाजारपेठेत सोन्याचे दर १ लाख २९ हजार रुपये प्रति तोळा आणि चांदीचे दर १ लाख ८० हजार रुपये प्रति किलो असे आहेत.
