योगेश गुंड
केडगाव : मृगात पेरणी केलेल्या खरिपातील मुगाच्या राशीला सुरुवात झाली आहे. अहिल्यानगर येथील बाजारपेठेत नवीन मुगाची आवक सुरू झाली आहे.
पावसाने उघडीप दिल्याने आता मुगाच्या राशीला वेग येणार आहे. दरम्यान, हरभरा व तुरीच्या दरात कमालीची घसरण झाली आहे. तसेच, सोयाबीनचे दरही गडगडले आहेत.
अहिल्यानगर तालुक्यात मुगाचे क्षेत्र कमी आहे. परंतु, येथील बाजारात शेजारील तालुक्यातील शेतकऱ्यांचा शेतीमाल मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी येतो.
पावसामुळे यंदा मुगाचा दर्जा खालावला आहे. तसेच ओलावाही मोठ्या प्रमाणात असल्याने शेतमालाच्या दर्जानुसार ६००० ते ८७०० प्रति क्विंटलप्रमाणे दर मिळत आहे.
मागील दोन महिन्यांपासून तुरीचे दर दिवसेंदिवस घसरत आहेत. तुरीच्या डाळीला मागणी कमी झाल्याने दरात घसरण होत आहे.
उदगीर शहर व परिसरात निर्माण होणाऱ्या तूर डाळीला देशाच्या कानाकोपऱ्यांतून मोठ्या प्रमाणात मागणी असते. तुरीला ७,२०० रुपये असलेला दर आता ६,७०० रुपयांपर्यंत खाली आला आहे.
नगरच्या बाजारातील मुगाची आवक
तारीख | भाव | आवक (क्विंटल)
२५ ऑगस्ट | ९,५०० | ९५०
२६ ऑगस्ट | ९,४०० | ९१६
२८ ऑगस्ट | ९,४०० | १३६०
२९ ऑगस्ट | ९,२०० | १२५०
३० ऑगस्ट | ९,०००| ४६०
मुगाला ८७६८ रुपये हमीभाव
शासनाने मुगाला ८७६८ रुपये क्विंटल हमीभाव जाहीर केला असला, तरी सध्या ओलावा व डागीचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे हमीभाव मिळत नाही. पावसाने उघडीप दिल्यास पुढील १५ दिवसांत मुगाची आवक वाढेल व दरही चांगला मिळेल, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.
हरभरा, सोयाबीनचे दरही ३०० रुपयांनी घसरले
मागील पंधरवड्यात हरभरा ६६०० रुपये, सोयाबीन ४८०० रुपये प्रति क्विंटल दराने विक्री होत होता. त्यामुळे डाळी व खाद्यतेलाच्या दरात वाढ झाली होती, परंतु मागील आठवड्यापासून हरभरा व सोयाबीनच्या दरात जवळपास ३०० रुपयांची घसरण झाली आहे. दर घसरल्याने नागरिकांना कमी दरात हरभरा डाळ व सोयाबीन खाद्यतेल उपलब्ध होण्याची आशा आहे.
अहिल्यानगर बाजार समितीत नवीन मुगाची आवक सुरू झाली आहे. चांगल्या गुणवत्तेच्या मुगाला चांगला भाव मिळत आहे. येत्या काही दिवसांत मुगाची आवक वाढू शकते. त्यानंतर नवीन सोयाबीनच्या हंगामाला सुरुवात होईल. - रंगनाथ खंडके, व्यापारी, बाजार समिती, नगर
अधिक वाचा: 'आयटी'तील नोकरी सोडून हिंगणगावचा रणजीत रमला ७० एकर शेतीत; वाचा सविस्तर