Join us

दर घसरल्याने नाशिकचा कांदा उत्पादक उतरला रस्त्यावर; संतप्त शेतकऱ्यांचे जिल्हाभर रास्ता रोको आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2025 09:59 IST

गेल्या काही महिन्यांपासून कांद्याच्या भावात मोठी घसरण झाली असून, चाळीत साठवलेला कांदा सडू लागण्याने शेतकरी त्रस्त आहेत. या घसरलेल्या कांदा भावाच्या निषेधार्थ संतप्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी शनिवारी (दि.२०) नाशिक जिल्ह्यातील विविध रस्त्यावर उतरत रास्ता रोको आंदोलन केले.

मालेगाव : गेल्या काही महिन्यांपासून कांद्याच्या भावात मोठी घसरण झाली असून, चाळीत साठवलेला कांदा सडू लागण्याने शेतकरी त्रस्त आहेत. या घसरलेल्या कांदा भावाच्या निषेधार्थ संतप्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी शनिवारी (दि.२०) रस्त्यावर उतरत तालुक्यातील सावतावाडी येथे रास्ता रोको आंदोलन केले.

तालुक्यातील सावतावाडी येथील महादेव मंदिरासमोर नामपूर रस्त्यावर शनिवारी (दि. २०) शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी तहसीलदारांनी फोनवरून आंदोलकांशी चर्चा केली. त्यानंतर वडनेर खाकुर्डीचे सहायक पोलिस निरिक्षक बाजीराव पाटील यांना निवेदन देण्यात येऊन सदर आंदोलन स्थगित कण्यात आले.

या आंदोलनात कजवाडे येथील सागर भामरे, सुनील शेवाळे, कैलास कापडणीस, एकनाथ कापडणीस, प्रवीण कदम, मोहन जाधव, मुरलीधर कापडणीस, किरण कापडणीस, सुनील शेवाळे, अनिल भदाणे आर्दीसह कांदा उत्पादक शेतकरी सहभागी झाले होते.

वाहनांच्या दुतर्फा रांगा

या आंदोलनामुळे रस्त्यावरील वाहतूक खोळंबली होती. त्याचा विपरीत परिणाम होऊन या रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे काही काळ वाहतूककोंडी झाली होती. मात्र, वडनेर पोलिसांनी सदर वाहतूक सुरळीत केली. यावेळी आंदोलकांनी रस्त्यावर कांदा टाकून तो वाहतुकीसाठी बंद केला होता. 

उमराणेत नाफेडचे कांदे वाहतूक करणारे ट्रक अडवले; दर घसरणीचा उद्रेक पुन्हा वाहतूक केल्यास ट्रक पेटवून देण्याचा इशारा

उमराणे : गेल्या महिनाभरापासून कांद्याच्या दरात सातत्याने घसरण होत असताना केंद्र सरकारने 'नाफेड'चे कांद बाजारात सोडल्याने संतप्त उत्पादक शेतकरी व स्वत शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी नाफेडचे कांदे वाहतूक करणारे ट्रक उमराणे येथे अडवून आंदोलन केले. त्यांनी आक्षेप नोंदवला की 'नाफेड'चे कांदे वाहतूक करू नयेत, अन्यथा वाहतूक करणाऱ्या ट्रकांना पेटवून देण्याचा इशारा देण्यात आला.

आगामी काळात कांद्याचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने नाफेड व एनसीसीएफच्या माध्यमातून कांद्याची खरेदी केली. मात्र, उन्हाळी (गावठी) कांद्याचे दर गेल्या महिनाभरात घसरून अवघे ५०० ते १००० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत खाली आले आहेत. 

अशा स्थितीत शासनाकडून भाववाढीचे प्रयत्न व्हायला हवेत, परंतु उलट नाफेड व एनसीसीएफचा कांदा बाजारात विक्रीस काढल्याने दर आणखी कोसळण्याची भीती आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (दि. १९) रात्री रस्त्यावरील उड्डाणपुलाजवळ शेतकरी व रयत शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कांद्याने भरलेले ट्रक आढवत गांधीगिरी आंदोलन केले.

'नाफेड'चा कांदा उमराणे, खारीफाटा कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये

दरम्यान, उमराणे व खारीफाटा बाजार समित्यांमध्ये नाफेड व एनसीसीएफने मोठ्या प्रमाणात कांदा साठवून ठेवला असून, या कांद्याची मनमाड व लासलगाव रेल्वे स्थानकांवर वाहतूक सुरू असल्यामुळे उमराणे येथे गांधीगिरी आंदोलन पेटले.

आंदोलन तीव्र करण्याचा इशारा

• आज गांधीगिरी केली आहे; परंतु नाफेडची कांदा विक्री सुरूच राहिली तर पुढील आंदोलन तीव्र स्वरूपात केले जाईल. पुन्हा वाहतूक केल्यास कांदा भरलेले ट्रक पेटवले जातील, असा इशाराही रयत क्रांती सेतकरी संघटना व शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटनेच्या कार्यकत्यांनी दिला.

• या आंदोलनात रयत शेतकरी संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष दीपक पगार, जिल्हाध्यक्ष प्रवीण अहिरे, तालुकाध्यक्ष मयूर नेरकर, उपाध्धाक्ष विठ्ठल महाजन, कार्याध्यक्ष भास्कर बागुल यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

• ट्रकचालक व मालकांचा पुष्प व शाल-श्रीफळ देऊन सन्मान करत त्यांना नाफेडचा कांदा वाहतूक न करण्याचे आवाहन करण्यात आले.

कांदाप्रश्नी नाशिक-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर प्रहार शेतकरी संघटनेतर्फे रास्ता रोको आंदोलन 

येवला : कांद्याचे दिवसेंदिवस घसरते भाव शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आणत असून, दर वाढतील या आशेवर साठवलेला कांदा सडला. कांद्याला योग्य भाव द्यावा, विक्री झालेल्या कांद्याला प्रतिक्विंटल एक हजार रुपये अनुदान देण्याची मागणी करण्यासाठी शनिवार दि. २० रोजी नाशिक-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर प्रहार शेतकरी संघटनेच्या वतीने तब्बल दीड तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. दोन्ही बाजूला दोन किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

अध्यक्ष गणेश निंबाळकर, संपर्क प्रमुख विनोदसिंग परदेशी, तालुकाध्यक्ष हरिभाऊ महाजन, किरण चरमळ, क्रांतीवीर छावा संघटनेचे गोरख संत यांच्या नेतृत्वाखाली एरंडगाव येथे आंदोलन करीत शेतकऱ्यांनी रोष व्यक्त केला. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात रोष व्यक्त करत आपल्या व्यथा मांडल्या. सहकार अधिकारी विनायक काळे यांना निवेदन दिल्यानंतर आंदोलन थांबवण्यात आले.

सरपंच शिवाजी खापरे, कचरू उराडे, एकनाथ जगताप, विठ्ठल जगताप, अमोल तळेकर, रशीद पटेल, सुनील पाचपुते, भाऊसाहेब झांबरे, विठ्ठल वाळके, बबन पिंगट, संतोष रंधे, वाल्मिक घोरपडे, आत्माराम रंधे, योगेश ठोंबरे, नवनाथ घोरपडे, संदीप गायकवाड आदींसह शेकडो शेतकरी सहभागी झाले होते. यावेळी पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक, पोलीस उपनिरीक्षक हर्षवर्धन बहिर यांनी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवला होता.

हेही वाचा : शेतकऱ्यांसाठी कोल्डप्रेस तेल उद्योग एक सुवर्णसंधी; कमी गुंतवणुकीत जास्त नफा देणारा व्यवसाय

टॅग्स :नाशिककांदाशेतकरीशेतीबाजारशेती क्षेत्रमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीसरकार