रिसोड येथील कृषी उत्पन्न बाजार समिती (APMC) हळद (Turmeric) खरेदी-विक्रीच्या क्षेत्रात नवनवीन उच्चांक प्रस्थापित करीत आहे. हळद उत्पादक शेतकऱ्यांना ( Farmer) आधुनिक तंत्रज्ञान व मार्गदर्शन मिळावे यासाठी दरवर्षी बाजार समिती हळद परिषदेचे आयोजन करते.
यंदाही रविवार, २३ फेब्रुवारी रोजी हळद परिषदेचे (Turmeric Council) आयोजन करण्यात आले आहे. तसेच, रिसोड (Risod) तालुक्यात मोठ्या प्रमाणावर चिया पिकवणाऱ्या शेतकऱ्यांसाठी चिया (Ciya) खरेदीचा शुभारंभ देखील याच दिवशी करण्यात येणार असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती विष्णुपंत भुतेकर यांनी दिली.
बाजार समितीच्यावतीने भागातील चिया उत्पादक शेतकऱ्यांना आपले उत्पादन विक्रीसाठी रविवार, २३ फेब्रुवारी रोजी बाजार समितीत आणण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हळद परिषदेचे उद्घाटन जिल्हा उपनिबंधक ओमप्रकाश साळुंखे यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाजार समितीचे माजी सभापती व विद्यमान ज्येष्ठ संचालक शामराव पाटील उगले तर उपाध्यक्ष म्हणून इंदुताई तेजराव वानखेडे उपस्थित राहणार आहेत.
२३ फेब्रुवारी रोजी रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीत आयोजित हळद परिषद शेतकऱ्यांसाठी मोलाची ठरणार आहे. या कार्यक्रमात हळद संशोधन व चिया पीक व्यवस्थापनावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
परजिल्ह्यातील हळद उत्पादक येणार
हळद उत्पादक शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान व मार्गदर्शन मिळावे यासाठी शेतकऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे. परिषदेचा व चिया खरेदी उपक्रमाचा हळद व चिया उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. तसेच या परिषदेत परजिल्ह्यातील हळद उत्पादक येणार आहेत. - विष्णुपंत भुतेकर, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, रिसोड
या तज्ज्ञांचे लाभणार शेतकऱ्यांना मार्गदर्शन
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरिफ शहा, हळद संशोधन केंद्र, माजी प्रभारी अधिकारी दिलीप काटमले, आत्मा प्रकल्प संचालक अनिसा महाबळे, टर्मरिक कमोडिटी, दूरदर्शनचे सुरेश मनचंदा, उपसंचालक, आत्मा किशोर मोरे, रिसोड तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर, कृषी विज्ञान केंद्र, करडाचे हळद तंत्रज्ञ निवृत्ती पाटील, सांगली येथील हळद इंडस्ट्रीचे महेश गाडवे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
विक्रमी हळद उत्पादकांचा सन्मान
रविवारी सकाळी ११ वाजता हळद परिषदेला प्रारंभ होणार असून, यंदा विक्रमी हळद उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांचा संपत्नीक साडी-चोळी देऊन सत्कार करण्यात येणार आहे. निवड करण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पाहणी करण्यात आली आहे.