Market Update : मागील वर्षीच्या खरीप व रब्बी हंगामात शेतमालाला मिळालेल्या कमी दरांमुळे शेतकऱ्यांवर पुन्हा पीक पद्धतीबाबत विचार करण्याची वेळ आली आहे. (Market Update)
तुरीला ११ हजार व हळदीला १५ हजार रुपयांचा दर असल्याने शेतकऱ्यांनी या दोन पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली; परंतु या पिकांच्या दरांत वर्षभरात पाच हजारांची घट झाली. त्यामुळे काय पेरावे, डोकच चालेना, असे म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
अतिवृष्टी, कोरडा व ओला दुष्काळ या नैसर्गिक संकटातून वाचलेल्या पिकातून वर्षभर कुटुंबाचा उदरनिर्वाह होईल, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा असते. मात्र, उत्पादन कमी होऊनही बाजारात शेतमालाला योग्य दर मिळत नाही. शेतमाल बाजारात आला की दर घसरतात, हा शेतकऱ्यांचा नेहमीचा अनुभव आहे.
शेती उत्पन्नात थेट घसरण
दर घसरणीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. तुरीसारख्या पिकात उत्पादन खर्च कमी असला तरी दर घसरल्याने लाभांश नाहीसा झाला आहे, तर हळदीच्या उत्पादनात बी-बियाणे, प्रक्रिया, साठवणूक, मजुरी, पाणी अशा खर्चाचा भार अधिक असल्याने थेट तोटा सहन करावा लागत आहे.
शेती हा व्यवसायच, पण धोका जास्त !
शेती हा आजही राज्यातील बहुसंख्य लोकांचा व्यवसाय आहे. मात्र, हा व्यवसाय अनेकदा 'नफा कमी, धोका जास्त' अशा अवस्थेत ढकलला जातो. दराचा अंदाज बांधता न येणे, व्यापाऱ्यांचा मनमानी दर आणि सरकारकडून हमीभाव न मिळणे, या सर्वांनी मिळून शेतकरी अस्वस्थ झाले आहेत.
विविधतेची पीकपद्धती स्वीकारणे आवश्यक !
बाजारावर अंधविश्वास न ठेवता शाश्वत आणि विविधतेची पीकपद्धती स्वीकारणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी केवळ मागील वर्षांच्या दरावरून पिकांची निवड केली, तर अशा संकटांना सामोरे जावे लागेल, असे बाजारतज्ज्ञांकडून सांगण्यात आले.
शेतकऱ्यांना काय हवे?
दर हमीची खात्री : बाजारभावावर अवलंबून न राहता किमान हमीभाव मिळावा, हमीदर केंद्रे लवकर सुरू करावी.
साठवणूक व प्रक्रिया केंद्रे : हळद आणि तुरीचे प्रक्रिया उद्योग वाढले, तर बाजारपेठ मजबूत होईल.
माहिती आणि मार्गदर्शन : कोणते पीक, कधी आणि किती क्षेत्रात घ्यावे, याचे कृषी विभागाने ठोस मार्गदर्शन करावे.
१५ हजारांच्या आशेवर हळद घेतली. पेरणीपासून काढणीपर्यंतचा खर्च किमान ८०-९० हजार झाला. आता दर इतका पडला की विकावे की साठवावे, हेच समजेनासे झाले. जास्त दर मिळेल म्हणून तूर घेतली, पण तिथेही हाच खेळ. - सचिन टिकार, शेतकरी, बोरी अडगाव