संजय लव्हाडे
केंद्र सरकारने हमी भावाप्रमाणे नोंदणी सुरू केली आहे. नाफेडने ४ हजार ४६९ शेतकऱ्यांकडून ६६ हजार ४५९ क्विंटल सोयाबीनची खरेदी केली आहे. सोने, चांदीच्या दरात विक्रमी तेजी आली असून नारळ, तूर, खाद्यतेल, गुळ महागला आहे. नवीन गहू, ज्वारी, मका बाजारात आला आहे.
केंद्र शासनाने तुरीचा हमीदर ७,५५० रुपये असा निश्चित केल्याने याच दराने वाळलेली व स्वच्छ केलेली तूर खरेदी करण्यात येणार आहे. यासाठी शेतकऱ्यांनी नाव नोंदणी ऑनलाइन पद्धतीने करावयाची आहे.
शेतकऱ्यांनी तूर खरेदी केंद्रावर नोंद करण्यासाठी जमिनीचा सातबारा उतारा व त्यावर तुरीची नोंद असलेला २०२४-२५ पीक पेरा, आठ-अ, आधारकार्ड आणि आयएफएससी कोडसह बँकेचे पासबुक झेरॉक्स, मोबाइल नंबर आदी संपूर्ण कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.
राज्यातील बहुतांश भागांमध्ये नारळाची आवक ही दक्षिण भारतातील कर्नाटक, तमिळनाडू, आंध्र प्रदेश या तीन राज्यांतून होते. सामान्यतः सण, उत्सव काळात नारळाला मागणी वाढत असल्याने किरकोळ प्रमाणात भाववाढ होते. परंतु, यंदा एकीकडे मागणी वाढलेली असताना, आवकमध्ये घट झाल्याने दराने अचानक उसळी घेतली आहे.
गणेशोत्सव काळात साधारणतः घाऊक बाजारात पंधराशे ते अठराशे रुपये शेकडा या दराने नारळ विक्री होत होता. सद्यस्थितीत घाऊक बाजारातील नारळाचे दर पंचवीसशे ते तीन हजार रुपये शेकडापर्यंत पोहचले आहेत.
गुंतवणूक फायद्याची
• बाजारपेठेचा कधी आणि कसा मूड बदलेल, याचा अंदाजही येत नाही. इतक्या पटकन गोष्टी बदलत असताना सोने, चांदीच्या दरातील गुंतवणूक ही फायद्याची ठरली आहे.
• दहा वर्षात जवळपास सोन्याच्या दराने ग्राहकांना दुप्पट रिटर्न्स मिळवून दिले. जालना बाजारपेठेत सध्या सोन्याचा दर ८५ हजार ५०० रुपये प्रतितोळा, तर चांदीचा दर ९७ हजार रुपये प्रतिकिलो असा आहे.
बाजारभाव
गहू | २,६४० ते ३,१०० |
ज्वारी | २,१०० ते ३,९०० |
बाजरी | २,२५० ते २,६७५ |
मका | १,७५० ते २,२२८ |
तूर (पांढरी) | ६,५०० ते ७,५५० |
तूर (लाल) | ६,२०० ते ७,३२० |
तूर (काळी) | ९,०५३ ते १०,८५५ |
हरभरा | ५,३०० ते ५,८२० |
सोयाबीन | ३,२०० ते ४,०५० |
नारळाच्या दरात वाढ
• काही दिवसांपूर्वी १२० ते १३० रुपये प्रतिकिलोने विक्री होणारे खोबरे सध्या अडीचशे ते तीनशे रुपये प्रतिकिलो झाले आहेत. चाळीस रुपयांना मिळणारे शहाळे सध्या साठ ते सत्तर रुपयांना विक्री होत आहे. दक्षिणेकडील तीन राज्यांपैकी एका राज्यातून होणारी आवक निम्यावर आली आहे.
• नारळाच्या मागणीच्या तुलनेत पुरवठा होत नसल्याने भावामध्ये तेजी आहे. खोबरे व शहाळ्याच्या दरांवरही याचा परिणाम होत आहे. आवक सुरळीत होईपर्यंत तेजी कायम राहण्याचा अंदाज आहे. जालना बाजारपेठेत ६० भरती नारळाच्या पोत्याचे दर १,१५० ते १,२०० रुपये असे आहेत.