Join us

सरकी ढेप अन् खाद्यतेलाचे बाजारभाव वाढले; साखरेच्या दरात देखील वाढ होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2025 10:14 IST

Agriculture Market Rate Update : गेल्या दोन-तीन दिवसांपासून सतत पाऊस सुरू असल्यामुळे बाजारपेठेत गिऱ्हाइकी कमी झाली आहे. दरम्यान सरकी ढेपेने भावाचा उच्चांक गाठला आहे. तर खाद्यतेलामध्ये पुन्हा सरकार आयात शुल्क लावणार, अशी बाजारात मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे.

संजय लव्हाडे

जालना बाजारपेठेत गेल्या दोन-तीन दिवसांपासून सतत पाऊस सुरू असल्यामुळे गिऱ्हाइकी  कमी झाली आहे. सरकी ढेपेने भावाचा उच्चांक गाठला आहे. खाद्यतेलामध्ये पुन्हा सरकार आयात शुल्क लावणार, अशी बाजारात मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे. सोन्या-चांदीमध्येही काही प्रमाणात घसरण झाल्याचे दिसून येत आहे.

सरकी बाजारात नवा उच्चांक निर्माण झाला असून, साठवणूक कमी असल्याने बाजारपेठेत भाव प्रतिक्विंटल ५० रुपयांनी वाढले आहेत. सध्या सरकीचा भाव ३८५० रुपये प्रतिक्विंटल आहे. दुग्ध जनावरांसाठी लागणारी उत्पादन सरकीढेप उत्पादन व स्टॉक कमी असल्याने तसेच नवीन कापसाचे येण्यासाठी कालावधी लागणार असल्याने सरकी ढेपेच्या भावात मोठी तेजी आली आहे.

कोणत्याही व्यापाऱ्याकडे मोठा स्टॉक शिल्लक नसल्याने येत्या काळातही यामध्ये तेजी राहण्याचे संकेत दिले जात आहेत. पुढील एका महिन्यापर्यंत तरी यातील तेजी कमी होण्याची शक्यता दिसून येत नाही. सध्या सरकी ढेपेचे भाव ३८५० ते ३९५० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत जाऊन पोहोचले आहेत.

दुग्धजनावरांना लागणारे पशुखाद्याचे भाव वधारल्यामुळे दुग्धव्यावसायिक अडचणीत सापडले आहेत. गेल्या काही दिवसांपासून सोयाबीनच्या दरात झालेल्या वाढीमुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. सध्या सोयाबीन ४७०० ते ४८०० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत.

येत्या काही दिवसांत साखरेमध्ये २० ते २५ रुपये क्विंटलमागे वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. साखरेचे सध्या भाव ४१०० ते ४३५० रुपये प्रतिक्विंटल आहे. यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

काही प्रमाणात घट

• सराफा बाजारात सोने-चांदीच्या दरात सातत्याने बदल होताना दिसून येत आहेत. रक्षाबंधनानंतर सोन्याच्या दरात सातत्याने घट झाली आहे.

• अशातच गोपाळष्टमीलाही सोन्याच्या दरात घट झाली आहे. २४ कॅरेट १० तोळे सोन्याच्या दरात ६०० रुपयांची घट झाली आहे. सोने १ लाख १ हजार रुपये प्रतितोळा आणि चांदी १ लाख १७ हजार रुपये प्रतिकिलोवर पोहोचली आहे.

तेलांमध्ये तेजीची शक्यता

केंद्र सरकार पाम, सोया व सूर्यफुल तेलांवर आयात शुल्क वाढवण्याची तयारीत आहे, अशी बाजारात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. यामुळे येत्या काही दिवसांत सोया, पाम व सूर्यफुल तेलांमध्ये तेजीची शक्यता आहे.

हेही वाचा : उच्च शिक्षित दोन भावंडांनी केळीतून कमावले २८ लाख; बारूळच्या केळीचा परराज्यात गोडवा

टॅग्स :बाजारदूधसोनंशेतकरीमराठवाडामार्केट यार्डशेती क्षेत्र