Join us
Daily Top 2Weekly Top 5

अक्षय्य तृतीयेनंतर आंब्याचे दर निम्म्याने कमी; कोकण, कर्नाटकातून येत असलेल्या आंब्याला वाचा किती मिळतोय दर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2026 11:29 IST

अक्षय तृतीयेनंतर आंब्याचे दर निम्म्याने कमी; कोकण, कर्नाटकातून येत असलेल्या आंब्याला वाचा किती मिळतोय दर

अजित घस्ते

अक्षय तृतीयेनंतर मार्केट यार्डाच्या फळ बाजारात आवक वाढल्यामुळे आंब्यांच्या दरात पन्नास टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे. सध्या बाजारपेठेत उत्तम दर्जाचा आंबा ४०० ते ६०० रुपये डझन दराने उपलब्ध असल्याची माहिती आंबा व्यापाऱ्यांनी दिली.

मागील आठवड्यात अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर आंब्याचे दर गगनाला भिडले होते. सण संपताच शुक्रवारी मागणीच्या तुलनेत आंब्याची आवक दुपटीने वाढल्याने दरातही निम्म्याने घसरण झाली.

कोकण, कर्नाटकासह इतर ठिकाणांहून आणखीन आवक वाढण्याची शक्यता पुणे बाजारातील आंबा व्यापारी युवराज काची यांनी व्यक्त केली.

५० टक्क्यांची घसरण

गेल्या आठवड्यापर्यंत ८०० ते १२०० रुपये डझन मिळणारा हापूस आंबा आता निम्म्या दराने मिळत आहे. ४०० ते ५०० रुपये डझनापर्यंत भाव खाली आल्याने सामान्य ग्राहकांचा कल आंबाखरेदीसाठी वाढला आहे. हापूसबरोबर, पायरी आणि इतर स्थानिक जार्तीच्या आंब्यांच्या दरातही घसरण झाली आहे.

चव, गंध, त्वचा, आकारानुसार असा असतो हापूसचा फरक

• कोकण हापूस : या आंब्याची त्वचा अत्यंत पातळ आणि गुळगुळीत असते. पिकल्यावर हा आंबा केशरी-पिवळ्या रंगाचा दिसतो. जास्त डाग किंवा सुरकुत्या नसतात. कोकण हापूसचा सुगंध अतिशय तीव्र आणि मनमोहक असतो.

आंबा खोलीत एका कोपऱ्यात ठेवला तरी पूर्ण घरभर त्याचा वास दरवळतो. कोकण हापूस आंबा खालच्या बाजूने थोडा गोल आणि सुबक असतो. कोकण हापूस आंब्याची किंमत उत्पादन खर्च आणि गुणवत्तेमुळे नेहमी कर्नाटक आंब्यांपेक्षा जास्त असते.

• कर्नाटक हापूस : याची त्वचा कोकण हापूसच्या तुलनेत थोडी जाड असते. याचा रंग गडद पिवळा किंवा काही वेळा हिरवट-पिवळा असतो. यावर बारीक पांढऱ्या रंगाचे ठिपके अधिक ठळकपणे दिसू शकतात. हा कोकण आंब्याच्या तुलनेत खायला कमी गोड असतो.

कर्नाटक हापूस याचा सुगंध खूप सौम्य असतो. आंबा नाका जवळ नेल्याशिवाय त्याचा वास सहसा जाणवत नाही. कर्नाटक हापूस हा आकाराने थोडा लांबट आणि खालच्या बाजूला टोकदार असतो.

बाजारपेठेतील विविध प्रकारच्या आंब्यांच्या दराची स्थिती

आंब्याचा प्रकारसध्याचे दरमागील आठवड्यातील दर
कोकण हापूस (४ ते ५ डझन)१५०० ते ४५००२५०० ते ७००० 
कर्नाटक हापूस (४ ते ५ डझन)१००० ते १५०० २,५०० ते ३,५०० 
केशर (प्रति किलो)६० ते ७० ९० ते १०० 
लालबाग (प्रति किलो)५० ते ६० ९० ते १२० 
तोतापूरी (प्रति किलो)२५ ते ३० ४० ते ६० 

कोकणासह कर्नाटकी हापूस आंब्यांची आवक वाढल्याने घाऊक बाजारासह किरकोळ बाजारातही आंब्याच्या किमतीत मोठी घट झाली. भाव कमी होताच मार्केट यार्डात खरेदीसाठी गर्दी होत आहे. कर्नाटक आंब्याला मागणी वाढली आहे आहे. येत्या रविवारीही आंबा खरेदीसाठी गर्दी होईल. - रोहन उरसळ, कर्नाटक आंबा आडते.

अक्षय तृतीयेनिमित्त दर तेजीत होते. आता दर कमी झाल्याने ग्राहकांची गर्दी झाली. सणानंतर दरवर्षी आवक वाढते, पण यंदा आवक दुप्पट झाली आहे. जो आंबा ८०० रुपयांत एक डझन होता, तो आता ४०० रुपयांवर आला आहे. मागील आठवड्यात आवक ७ ते ८ हजार होती. आता तीच आवक १५ ते १८ हजारांवर गेल्याने भाव कमी झाले आहेत. पुढील १५-२० दिवस आंब्यांचे दर स्थिर राहतील, ज्यामुळे ग्राहकांना मनसोक्त आस्वाद घेता येईल. - युवराज काची, आंबा आडते, मार्केट यार्ड, पुणे.

अक्षय तृतीयेपर्यंत टंचाई; आता आवक वाढली, दर उतरले

अक्षय तृतीयेपर्यंत रत्नागिरी आणि देवगड हापूसची टंचाई जाणवत होती. मात्र, आता बागांमधून आंबा काढणीला वेग आला आहे. मार्केट यार्डात दररोज १५ ते १८ हजार पेट्यांची आवक होत आहे. कोकण हापूस आंबा सणापूर्वी ८०० ते १२०० रुपये डझन असलेला हापूस आता ४०० ते ७०० रुपयांपर्यंत उपलब्ध आहे.

हेही वाचा : उन्हात काम करत असाल तर काळजी घ्या; हृदय अन् किडनीवर येतोय ताण

English
हिंदी सारांश
Web Title : Mango prices halved after Akshaya Tritiya due to increased supply.

Web Summary : Mango prices plummeted post-Akshaya Tritiya due to doubled market supply from Konkan and Karnataka. Hapus now sells for ₹400-600/dozen, down from ₹800-1200. Consumers are buying more as prices stabilize. Further price drops unlikely for 15-20 days.
टॅग्स :आंबाशेती क्षेत्रशेतकरीमार्केट यार्डफळे