Join us

आंबा कॅनिंगला सुरवात प्रतिकिलोमागे शेतकऱ्यांना मिळतोय एवढा दर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2024 10:23 AM

सर्वत्र आंबा निर्यात सुरू असतानाच अचानक आंबा कॅनिंगला प्रारंभ झाला आहे. मात्र, प्रारंभीच प्रतिकिलोमागे केवळ २५ रुपये एवढा नगण्य दर दिला जात असल्याने आंबा बागायतदारांमधून प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे.

सर्वत्र आंबा निर्यात सुरू असतानाच अचानक आंबा कॅनिंगला प्रारंभ झाला आहे. मात्र, प्रारंभीच प्रतिकिलोमागे केवळ २५ रुपये एवढा नगण्य दर दिला जात असल्याने आंबा बागायतदारांमधून प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे.

गतवर्षी कॅनिंगला ५० रुपये दर होता. यावर्षी किमान ५५ रुपये प्रतिकिलो दर मिळावा, अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा आंबा-काजू बागायतदार संघटनेचे अध्यक्ष जयप्रकाश चमणकर यांनी केली आहे. कोकणात इतर पिकांसोबतच आंबा हे पीक प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात घेतले जाते.

इथला तरुण आज आंबा व्यवसायात उतरला आहे. इथल्या अर्थव्यवस्थेत आंबा पीक हे महत्त्वाची भूमिका बजावत आहे. आंब्याच्या बागांमध्ये काम करत असताना झाडांना खत घालण्यापासून ते आंबा निर्यात करण्यापर्यंत तरुणांना रोजगार मिळाला आहे. परिणामी, काही अंशी बेरोजगारीचे प्रमाण कमी झाली आहे.

काही तरुण मोठ्या बागायतदारांकडे कामाला जातात, तर काही तरुणांनी स्वतः आंब्याच्या बागा कराराने घेतल्या आहेत. साधारणतः जानेवारी-फेब्रुवारीपासून सर्रास आंबा पीक तयार झाल्यानंतर त्याची काढणी करून तो निर्यात केला जातो.

दरम्यान, अलीकडे बदलत्या हवामानाचा फटका वारंवार आंबा पिकाला बसत आहे. सतत वाढत असलेल्या उष्णतेमुळे आंबा पिकविणे आता जिकिरीचे झाले आहे. त्यामुळे उरलेल्या पिकासाठी कॅनिंग हाच पर्याय बागायतदारांकडे असतो. कॅनिगला चांगला दर मिळाला तर शेतकऱ्यांना दिलासा मिळतो.

यावर्षी कॅनिगच्या प्रारंभीच अगदी नगण्य दर असल्यामुळे बागायतदारांची निराशा झाली आहे. अनेक फवारण्या, झाडांची मशागत, बागेची स्वच्छता अशा असंख्य गोष्टींवर बागायतदारांना खर्च होत राहतो. फळमाशी व अन्य रोगांवर नियंत्रण ठेवणे हेही आव्हानच आहे.

बऱ्याचदा अवकाळी पावसामुळेही आंबा पीक धोक्यात येते. त्यामुळे सरकारने आंबा पिकाला हमीभाव देणे गरजेचे आहे. यासाठी शासन दरबारी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. आंबा कॅनिंगला सरकारने १०० रुपये प्रतिकिलो हमीभाव द्यावा, अशी मागणी येथील बागायतदारांमधून होत आहे.

यावर्षी आंबा पीक लांबले आहे. त्यात पावसाचा फटका बसला आणि आता वाशी व बेळगाव मार्केट पूर्णपणे गडगडले आहे. त्यामुळे निदान कॅनिंगमधून तरी बागायतदारांच्या हाती पैसा येण्यासाठी कॅनिंगचे दर वाढणे गरजेचे आहे. - प्रशांत मालवणकर, वेंगुर्ला

आंब्यांवर फवारण्या करावयाच्या औषधांच्या किमती भरमसाट वाढल्या आहेत. आंबा काढण्यासाठी लागणाऱ्या खोबल्यांची किंमत गेल्यावर्षी २०० रुपये होती. ती यावर्षी ३५० झाली आहे. बागांमध्ये आवश्यक लागणाऱ्या वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत, तर आंबा शेतकरी जे पिकवितो आणि विकतो त्याला मात्र कवडीमोल भाव आहे. यंदाच्या परिस्थितीवरून औषधांचे पैसे तरी वसूल होतात की नाही याबाबत शंकाच आहे. - समीर वारंग, वेंगुर्ला

अधिक वाचा: पावसामुळे आंबा डागळातोय कसे कराल व्यवस्थापन

टॅग्स :आंबाशेतकरीकोकणसिंधुदुर्गशेतीकीड व रोग नियंत्रणपाऊसबाजारमार्केट यार्ड