Join us
Daily Top 2Weekly Top 5

हापूसची आवक वाढली, दर गडगडला त्यात कॅनिंगसाठी खरेदी बंद; बागायतदारांनी आंबा विकायचा कुठे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2026 14:04 IST

hapus mango market गेल्या आठवड्यापासून उष्मा मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. वाढत्या उष्यामुळे झाडावरील आंबा लवकर तयार होत असल्याने बाजारातील आवक वाढली आहे.

रत्नागिरी: गेल्या आठवड्यापासून उष्मा मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. वाढत्या उष्यामुळे झाडावरील आंबा लवकर तयार होत असल्याने बाजारातील आवक वाढली आहे.

त्यातच आखाती देशातील युद्धामुळे निर्यात बंद असल्याने नवी मुंबई उत्पन्न बाजार समितीत कोकणासह अन्य राज्यातील आंबा मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी आलेला आंबा कुठे विकायचा, असा प्रश्न विक्रेत्यांपुढे आहे.

त्यामुळे दर गडगडले आहेत. गडगडलेला दर परवडत असेल तर आंबा पाठवा, अन्यथा पाठवू नका असे विक्रेते सांगत असल्याने बागायतदार चिंताग्रस्त झाले आहेत.

फळांचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंब्याला दरवर्षी विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. यावर्षी मोहोर चांगला येऊनही अति थंडीमुळे मोहोर करपला व अपेक्षित फळधारणा झाली नाही.

जेमतेम १५ ते २० टक्के उत्पादन असल्याचा अहवाल कृषी विभाग व कोकण कृषी विद्यापीठाने शासनाला दिला होता. दरवर्षी आखाती देशात हापूसला सर्वाधिक मागणी असते.

मात्र यावर्षी युद्धामुळे वाहतूक खर्च वाढल्याने निर्यात थांबली. देशांतर्गत विविध राज्यांतील बाजारपेठेत आंबा विकावा लागला. त्यामुळे यावर्षी सुरुवातीला आंब्याला दर चांगला मिळाला असला, तरी नंतर मात्र दर गडगडतच गेले.

सध्या ४ ते ५ डझनाच्या पेटीला ७०० ते १,२०० रुपये दर आहे. अर्थात हजार ते १,२०० रुपये हा दर फक्त मोजक्याच बागायतदारांना मिळत आहे. उर्वरित बागायतदारांची पट्टी ७०० ते ८०० रुपये एवढीच आहे.

खत व्यवस्थापनापासून आंबा बाजारात विक्रीला पाठवेपर्यंत येणारा खर्च पाहता सध्याचे परवडत नाही. स्वतः विक्रेतेच बागायतदारांना फोनद्वारे दर परवडत असेल, तरच विक्रीला पाठवा अन्यथा पाठवू नये, असे सांगत असल्यामुळे आंबा कुठे विकावा असा प्रश्न निर्माण झाला आहे.

तापमान वाढीमुळे आंबा तयार
◼️ यावर्षी मुळातच आंबा कमी आहे. परंतु, तापमान वाढल्यामुळे आंबा एकाच वेळी तयार झाल्यामुळे बाजारातील आवक वाढली आहे.
◼️ नाशवंत फळ असल्यामुळे ठेवण्यापेक्षा मिळेल त्या दराला बागायतदार विक्री करतात.
◼️ नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कोकणासह कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश येथून आंब्याची आवक वाढल्यामुळे बागायतदार मोठ्या प्रमाणावर आंबा आला आहे.
◼️ कोकणच्या हापूसला सध्या बाजारात ३०० ते ४०० रुपये डझन दर मिळत आहे.
◼️ परराज्यातील आंबा मात्र ७० ते ३५० रुपये किलो दराने विकण्यात येत आहे.

कॅनिंगचे दर वाढला मात्र खरेदी थांबली
◼️ दर कमी असताना कॅनिंगचे दर ५० रुपयांवरून थेट ३० रुपयांवर आणले गेले. याबाबत बागायतदारांनी पालकमंत्री उदय सामंत यांची भेट घेतली.
◼️ त्यावर पालकमंत्री सामंत यांनी कॅनिंग कंपन्यांना सज्जड दम भरत ५० रुपये दर देण्याची सूचना केली.
◼️ मात्र पालकमंत्र्यांच्या सूचनेला कॅनिंग कंपन्यांनी वाटाण्याच्या अक्षता दाखविल्या असून, खरेदीच बंद केली आहे.
◼️ त्यामुळे आगीतून फुफाट्यात अशी बागायतदारांची अवस्था झाली आहे.

खर्च किती अन् हातात किती? 
◼️ पेटीला दर - ७०० ते ८०० रुपये.
◼️ खत व्यवस्थापन ते कीटकनाशक फवारणी खर्च - १५० ते २०० रुपये.
◼️ वाहतूक खर्च - २०० रुपये.
◼️ पॅकींग खर्च - १२५ रुपये.
◼️ बागायदारांच्या पदरात - १७५ रुपये.

अधिक वाचा: Monsoon Update : नैर्ऋत्य मान्सून येण्याची तारीख जाहीर; किती तारखेला दाखल होणार मान्सून?

English
हिंदी सारांश
Web Title : Hapus Mango Glut: Prices Crash, Canning Stops, Farmers Despair.

Web Summary : Increased heat ripened mangoes quickly, flooding markets. Export halts due to Gulf tensions worsened the price crash. Canning factory closures left farmers with few options and minimal profits amidst rising costs.
टॅग्स :आंबाबाजारमार्केट यार्डकाढणी पश्चात तंत्रज्ञानकाढणीशेतकरीशेतीसरकारउदय सामंत