Zendu Flower Market : दसऱ्याच्या तोंडावर झेंडू फुलांचा बाजार अक्षरशः फुलून गेला. बीड येथील बाजारात चार हजार क्विंटलपेक्षा जास्त झेंडूची आवक झाली. सकाळी शंभरीने सुरुवात झालेल्या दराने दुपारी दीडशे रुपये गाठले, पण सायंकाळी अचानक पावसाचा सडाका बसताच भाव थेट ३० रुपयांवर आला. (Zendu Flower Market)
शेतकऱ्यांच्या मेहनतीच्या फुलांचा खरा फायदा व्यापाऱ्यांनी घेतल्याची खंत शेतकऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे. (Zendu Flower Market)
बीड, नांदेड जिल्ह्यातील अतिवृष्टीने शेतकरी आणि फुलशेतीला मोठा फटका दिला. तरीही दसऱ्यानिमित्त बीडमध्ये झेंडूची तब्बल ४ हजार क्विंटल आवक झाली. (Zendu Flower Market)
तर नांदेडमध्ये झेंडू उत्पादकांनी जिवाचा आटापिटा करून फुले वाचवली; मात्र व्यापाऱ्यांनी कमी भावाने खरेदी करून बाजारात दुप्पट, तीनपट दराने विक्री केली. यामुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षांवर पाणी फिरले. (Zendu Flower Market)
बीडमध्ये रंगला झेंडू बाजार
दसऱ्याच्या दिवशी बीड शहरात झेंडू फुलांची मोठी आवक झाली. जालना रोड, अण्णाभाऊ साठे चौक, सुभाष रोड, डीपी रोड परिसर झेंडू विक्रीसाठी फुलून गेला होता.
सकाळी भाव: १०० रुपये किलो
दुपारी भाव: १५० रुपये किलो
सायंकाळी भाव: ३० रुपये किलो (पावसामुळे भाव कोसळले)
पाटोदा तालुक्यातील शेतकरी पोपट वीर यांनी १६ गुंठ्यात झेंडू लावला होता. त्यापैकी ८ गुंठे पावसात सडले. उर्वरित झेंडू बीड बाजारात आणला असता चांगली मागणी मिळाली. मात्र, मुबलक आवक व पावसामुळे भाव खाली आल्याने विक्रीत चढ-उतार दिसून आले.
नांदेडमध्ये शेतकऱ्यांची मेहनत, व्यापाऱ्यांचा नफा
नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी अतिवृष्टीच्या तडाख्यात झेंडू पिकवण्यासाठी जीवाचा आटापिटा केला. पडलेली झाडे बांबू व आडोशाने उभी केली, औषधे फवारून फुलांचे रक्षण केले. तरीही फुलांच्या भावात अपेक्षित वाढ झाली नाही.
शेतकऱ्यांकडून खरेदी दर : ३० ते ४० रुपये किलो
बाजारभाव : ८० ते १०० रुपये किलो
हार विक्री : ४०० ते ५०० रुपये प्रति नग
व्यापाऱ्यांनी फुलं भिजलेली आहेत, झेंडू सडला आहे असे कारणे देत शेतकऱ्यांकडून कमी भावात झेंडू खरेदी केला. त्याच फुलांना बाजारात दुप्पट भाव मिळाला. त्यामुळे व्यापाऱ्यांच्या खिशात नफा गेला, तर शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडली.
शेतकरी काय सांगातात ?
चार महिने परिश्रम घेऊन पिकवलेल्या झेंडूला योग्य भाव मिळाला नाही. व्यापाऱ्यांचा फायदा झाला; पण शेतकऱ्यांचा श्रम वाया गेले असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
दसरा सणाला झेंडूची मागणी मोठी असली तरी पावसाचे संकट, मुबलक आवक आणि व्यापाऱ्यांचा फायदा यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षित भाव मिळाला नाही.
बीडमध्ये झेंडूची टवटवीत आवक झाली असली, तरी पावसामुळे भाव घसरले. नांदेडमध्ये मात्र व्यापाऱ्यांचा नफा वाढला आणि शेतकऱ्यांच्या मेहनतीला योग्य मोबदला मिळाला नाही.