Agriculture News : पारंपारिक पिकांना पर्याय म्हणून शेतकऱ्याने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतात टरबुजाची लागवड केली. बाजार चांगले दर असल्याने पिकाची निगा राखण्यात कोणतीच कमी केली नाही. लागवडीसाठी मल्चिंग पेपर, ठिबक सिंचन सुविधा तयार केली. एकूणच एकरी एक लाख रुपयांची गुंतवणूक करत कठोर परिश्रम केले. जेव्हा टरबूज विक्री योग्य झाले त्याचवेळी घात झाला.
टरबूजाचा दर २५ रुपये किलोवरून थेट ३ रूपयांवर आला आहे. या दरात तोडणी व वाहतूक खर्चही निघत नाही. त्यामुळे शेतातूनच टरबूज मोफत वाटप करण्याची वेळ ओढावली. घाटंजी तालुक्यातील रामनगर येथे राहणाऱ्या रमेश वाडगुरे यांनी तीन एकरांत टरबूजची लागवड केली होती. यासाठी त्यांना तीन लाख रुपयांपर्यंत खर्च आला होता.
बाजारात टरबुजाला दर मिळत नसल्याने शेतामध्येच टरबूज तोडून पूर्ण गावाला मोफत वाटप केले जात आहे. त्यात शेतकऱ्याचे पाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. इराण-इस्रायल आणि अमेरिका युद्धाचा परिणाम निर्यातीवर झाल्याचे सांगुन बाजारात शेतमालाचे दर पाडले जात आहे. त्यात स्थानिक शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान होत आहे. इतर पिकांच्याही दरावर याचा परिणाम झाल्याचे वाडगुरे यांनी सांगितले.
आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या शेतकऱ्यांना झळा
आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीचा सर्वाधिक फटका आयात-निर्यात धोरणाला बसला आहे. भाजीपाला, फळे व इतरही उत्पादने देशाबाहेर जाण्यावर निर्बंध येत आहेत. यामुळे आता गावपातळीवरील शेतकऱ्यांना सर्वाधिक झळ पोहोचू लागली आहे.
