Washim APMC News : मार्च एंडिंग आणि नाणे टंचाईमुळे गेल्या काही दिवसांपासून ठप्प असलेले वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीतील शेतमाल खरेदीचे व्यवहार आता पुन्हा पूर्ववत होणार आहेत.(Washim APMC News)
येत्या ६ एप्रिलपासून बाजार समितीतील लिलाव प्रक्रिया सुरळीत सुरू होणार असून, त्यापूर्वी प्रशासनाने ओट्यांवर पडून असलेल्या शेतमालाची मोजणी पूर्ण केली आहे. यामुळे शेकडो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.(Washim APMC News)
ओट्यांवरील मालाचा अडथळा दूर
१८ मार्चपासून बाजार समितीतील खरेदी व्यवहार तात्पुरते बंद ठेवण्यात आले होते. मात्र, या कालावधीपूर्वी सुमारे ३५० शेतकऱ्यांनी आपला शेतमाल अडत्यांकडे आणून ठेवला होता.
ओट्यांवर माल पडून राहिल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली होती, तसेच नवीन मालासाठी जागेची कमतरता निर्माण झाली होती.
६ एप्रिलला बाजार सुरू झाल्यावर कोणताही गोंधळ होऊ नये, यासाठी प्रशासनाने सोमवार, ३० मार्च रोजी ओट्यांवरील सर्व शेतमालाची मोजणी पूर्ण करून घेतली आहे.
मार्च एंडिंग आणि नाणे टंचाईचे सावट
बाजार समितीतील अडते आणि व्यापाऱ्यांनी नाणे टंचाई तसेच आर्थिक वर्षाच्या अखेरच्या ताळेबंदामुळे खरेदी व्यवहार बंद ठेवण्याची विनंती केली होती.
प्रशासनाने ही विनंती मान्य करत १८ मार्चनंतर व्यवहार थांबवले होते. मात्र, आता ताळेबंद पूर्ण झाल्याने आणि मोजणी प्रक्रिया आटोपल्याने ६ एप्रिलपासून व्यवहार पुन्हा जोमाने सुरू होणार आहेत.
६ एप्रिलपासून बाजार समितीतील शेतमाल खरेदी पूर्ववत सुरू होणार आहे. ओट्यांवर पूर्वी ठेवलेला शेतमाल मोजून घेण्याच्या सूचना दिल्या होत्या, त्यानुसार ३० मार्च रोजी मोजणी पूर्ण करण्यात आली आहे. आता लिलावासाठी जागा उपलब्ध झाली असून प्रक्रिया सुरळीत पार पडेल.-वामनराव सोळंके, सचिव, बाजार समिती, वाशिम.
कारंजा बाजार समिती ४ एप्रिलपर्यंत बंद!
वाशिममध्ये हालचाली सुरू असतानाच, कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीने मात्र ३० मार्च ते ४ एप्रिल दरम्यान व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
नाणे टंचाईचे कारण पुढे करत घेतलेल्या या निर्णयामुळे कारंजा तालुक्यातील शेतकऱ्यांसमोर आर्थिक अडचणी उभ्या ठाकल्या आहेत. स्थानिक शेतकरी संघटनांनी यावर तातडीने तोडगा काढण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.
अधिक वाचा : Gahu Bajarbhav: गहू हंगामातच तेजीत! दर वाढले; आता विकू की थांबू?
