वर्धा : अतिवृष्टीने सोयाबीन उत्पादकांच्या तोंडचा घास हिरावला. रक्त आटवून पिकविलेलं सोयाबीन बाजारात नेले असता शेतकऱ्याला ७५० रुपये प्रतिक्विंटल भाव देण्यात आला. त्यामुळे ही भावपट्टी म्हणजे शेतकऱ्याची थट्टाच असल्याचे, आता जगायचे तरी कसे ? असा प्रश्न उपस्थित केला आहे.
हिंगणघाट तालुक्यातील कोसुर्ला (मोठा) येथील शेतकरी उमेश भोकटे यांच्याकडे आठ एकर शेती आहे. यापैकी पाच एकरांमध्ये त्यांनी सोयाबीनची पेरणी केली होती. अतिवृष्टीने चांगलाच फटका बसला तरीही यातून कसेबसे पीक वाचविले. त्या पिकावर फवारणीपासून तर मळणीपर्यंत जवळपास लाख रुपया खर्च केला. आता तोंडावर दिवाळी असल्यामुळे त्यांनी सोयाबीनची मळणी करून हिंगणघाटच्या बाजार समितीत विक्रीस नेले. पण, तेथे कवडीमोल भाव मिळाल्याने शेतकरी निराश झाला.
लागवड खर्च तर सोडा बियाण्याचाही खर्च निघेना
कोसुर्ला येथील शेतकरी उमेश भोकटे यांनी आठ एकरापैकी पाच एकरांमध्ये सात बॅग सोयाबीनची पेरणी केली होती. या बियाण्याकरिता २१ हजार रुपयांचा खर्च आला. या सोयाबीनच्च्या पेरणीचा खर्च सात हजार झाला. त्यावर वारंवार तणनाशक, कीटकनाशक व इतर खतावर २० हजार रुपये खर्च करण्यात आला. यात मशागतीचा खर्च वेगळाच राहिला असून, सोयाबीन मार्केटपर्यंत नेण्याचा खर्चही दीड हजार रुपये करावा लागला.
एकंदरीत या सोयाबीन पिकाकरिता एक लाखांवर खर्च करावा लागला. त्यामुळे या पिकातून खर्च वजा जाता काही शिल्लक राहिल, अशी अपेक्षा शेतकऱ्याला होती. परंतु त्यांनी ११ क्विंटल सोयाबीन विकल्यावरही केवळ सात हजार २४८ रुपयेच मिळाले. त्यामुळे इतर खर्च त्यांना खिशातून करावा लागला.
बाजारपेठेत ११ क्विंटल सोयाबीनची केलीय विक्री
पावसाच्या फटक्यामुळे सोयाबीनची प्रत ढासळली होतीच, पण सोयाबीनला ५ हजार ३२८ रुपये प्रतिक्विंटल हमीभाव असतानाही भोकटे यांना ७५० प्रतिक्विंटल भाव देण्यात आल्याने धक्का बसला आहे. त्यांनी ११ क्विंटल सोयाबीनची विक्री केली असता त्यांच्या हातात केवळ ७ हजार २४८ रुपयांचाच चुकारा पडल्याने आता दिवाळी साजरी कशी करावी, असा प्रश्न पडला आहे.
माझ्याकडे आठ एकर शेती असून, पाच एकरांत सोयाबीनची लागवड केली होती. सोयाबीन हिंगणघाट बाजार समितीत विकायला नेल्यावर केवळ ७५० रुपये प्रतिक्विंटल भाव देण्यात आला. ११ क्विंटल सोयाबीनचा चुकारा ७ हजार २४८ रुपये मिळाला असून, यातून बियाण्याचाही खर्च भरून निघाला नाही.
- उमेश भोकटे, शेतकरी.