नितीन कांबळे
सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पिकलेल्या भाजीपाल्यावर पुराचे पाणी घुसल्याने शेतातच पालेभाज्या आणि फळभाज्या सडल्या. परिणामी बाजारात आवक कमी झाली असून दिवाळीच्या तोंडावर भाजीपाल्याचे दर आकाशाला भिडले आहेत. ( Vegetable Market)
शेतात पाणी, शेतकऱ्यांचे नुकसान
कडा परिसरासह अनेक भागात सलग पावसामुळे शेतात पाणी तुंबले. या पाण्यात भाजीपाल्याची पिके सडली, काही ठिकाणी तर जमिनीसकट वाहून गेली. यामुळे शेतकऱ्यांचे महिन्याभराचे परिश्रम आणि भांडवल वाया गेले.
टोमॅटोने पुन्हा उचल खाल्ली
अलीकडेच २० रु. किलो दराने विकला जाणारा टोमॅटो आता ४० रु. किलो झाला आहे. वातावरणातील बदल आणि ओलाव्यामुळे उत्पादन घटल्याने त्याचे भाव पुन्हा वाढले आहेत.
नवीन मालाची प्रतीक्षा
काही शेतकऱ्यांनी पाणी ओसरण्याची वाट पाहत नव्या लागवडीची तयारी सुरू केली आहे. मात्र, शेती अजूनही ओलसर असल्याने लगेच नवीन पिकांची लागवड करता येत नाही. महिना-दीड महिन्यानंतरच ताजा माल बाजारात दिसेल, अशी माहिती स्थानिक शेतकऱ्यांनी दिली.
अतिवृष्टीमुळे भाजीपाल्याचे उत्पादन कोसळल्याने बाजारात दरवाढ झाली आहे. शेतकऱ्यांच्या हाती चिखल, तर गृहिणींच्या हाती महागाई आली आहे.
बाजारात टंचाई, दरात उसळी
आवक घटल्याने बाजारात भाजीपाल्याची टंचाई निर्माण झाली आहे. परिणामी सर्वच भाज्यांचे दर झपाट्याने वाढले आहेत.
सध्या बाजारात कसे मिळत आहेत दर
मेथीची जुडी : ५० रु.
कोथिंबिरीचा भेळा : १०० रु.
पालक जुडी : ६० रु.
शेपू जुडी : ३० रु.
भोपळा : ६० रु. किलो
वांगे : १०० रु. किलो
गवार : २०० रु. किलो
शेवगा : २०० रु. किलो
उसनवारी करून टोमॅटो, कारले लावले होते, पण सर्व वाहून गेले. हाती फक्त चिखल उरला. - अंगद भूकन, शेतकरी
भाववाढ झाल्याने लोक कमी प्रमाणात भाजी घेत आहेत. त्यामुळे विक्री अपेक्षेप्रमाणे होत नाही. - सविता ढोबळे, भाजी विक्रेती
दिवाळीच्या काळात गृहिणी भाजी घेताना हात आखडता घेत आहेत, कारण दर दुप्पट झाल्याने बजेट वाढले आहे.