Tur Market : यंदा तुरीला शासनाने ८ हजार रुपये प्रति क्विंटल हमीभाव जाहीर केला असला, तरी आतापर्यंत बाजारात तुरीचे दर ६ हजार ५०० ते ६ हजार ७०० रुपयांच्या आसपासच स्थिर होते.(Tur Market)
मात्र, जानेवारी अखेरीस हंगाम सुरू होण्याआधीच तुरीच्या दरात अचानक वाढ झाली असून, खुल्या बाजारात दर साडेसात हजार रुपयांपर्यंत पोहोचले आहेत.(Tur Market)
अवघ्या चार-पाच दिवसांत प्रति क्विंटल ५०० ते ७०० रुपयांची दरवाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र, बहुतांश शेतकऱ्यांकडे साठवणूक केलेली तूर नसल्याने या दरवाढीचा लाभ साठेबाज व्यापाऱ्यांनाच अधिक मिळत असल्याची भावना शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.(Tur Market)
यावर्षी तुरीसाठी ८ हजार रुपये हमीभाव जाहीर करण्यात आला असून, नाफेडमार्फत खरेदी होण्याची शक्यता आहे. तरीही वर्षभर बाजारात तुरीला अपेक्षित दर मिळाला नाही.(Tur Market)
मागील तीन वर्षांपूर्वी तुरीचे दर १२ हजार रुपयांवर पोहोचले होते. त्या तुलनेत यंदा उत्पादन घटले असतानाही दर दीर्घकाळ कमीच राहिले. आता मात्र अचानक मागणी वाढल्याने दरात चढ-उतार दिसून येत आहेत.(Tur Market)
अतिवृष्टी, रोगराईमुळे उत्पादनात घट
यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस आणि काही भागांत अतिवृष्टी झाल्याने तुरीच्या पिकाचे मोठे नुकसान झाले. अनेक शेतांत पाणी साचल्यामुळे बुरशीजन्य मर रोगाचा प्रादुर्भाव झाला. तसेच ढगाळ वातावरणामुळे शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव वाढला. परिणामी, यंदा तुरीच्या सरासरी उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
हंगाम अजून पूर्णपणे सुरू नाही
सध्या बाजारात येणारी तूर ही प्रामुख्याने परदेशातून आलेली लेमन तूर तसेच कर्नाटकातील तूर आहे. विदर्भातील गावरान तुरीचा हंगाम जानेवारी अखेरनंतरच पूर्ण क्षमतेने सुरू होतो. त्यामुळे सध्या बाजारातील आवक मर्यादित असून, डाळ मिलर्स आणि व्यापाऱ्यांकडून मागणी वाढलेली आहे. याच कारणामुळे दरात अचानक वाढ झाल्याचे चित्र दिसत आहे.
नाफेड नोंदणी सुरू, पण केंद्रांचा प्रश्न
शासनाद्वारे हमीभावाने तुरीची खरेदी करण्यात येणार असून, यासाठी २० जानेवारी ते २० फेब्रुवारी या कालावधीत ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे. पण प्रत्यक्षात अनेक जिल्ह्यांत अद्याप खरेदी केंद्रे सुरू झालेली नाहीत. त्यामुळे तातडीने नाफेड खरेदी केंद्रे सुरू करावीत, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
तुरीच्या दरातील अलीकडील चढ-उतार (रु./क्विंटल)
०२ जानेवारी : ६,६५० ते ६,९११
०७ जानेवारी : ६,५०० ते ७,३६१
०९ जानेवारी : ६,८०० ते ७,३००
१४ जानेवारी : ६,५५० ते ७,२५१
१६ जानेवारी : ७,००० ते ७,५५१
१९ जानेवारी : ७,१५० ते ७,४५१
यवतमाळात दर साडेसात हजारांवर
यवतमाळ जिल्ह्यात खुल्या बाजारात तुरीचे दर साडेसात हजारांवर पोहोचले आहेत. मंगळवारी येथे तुरीला ६ हजार ते ७,५५० रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला. अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर पीक नष्ट झाल्याने बाजारात विक्रीसाठी येणारी तूर कमी आहे. त्यामुळे पुढील काळात दर आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरवाढीमागची कारणे
मर्यादित आवक, वाढलेली मागणी, लग्नसराईचा हंगाम, डाळींचा वाढलेला वापर, तसेच उत्पादनात घट या सर्व घटकांचा तुरीच्या दरावर परिणाम झाला आहे.
आगामी काळात विदर्भातील गावरान तूर मोठ्या प्रमाणात बाजारात आल्यानंतर दरांची दिशा काय राहते, याकडे शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे लक्ष लागले आहे.
हे ही वाचा सविस्तर : Tur Market : तूर उत्पादकांना दिलासा; मोंढ्यात दररोज बीट सुरू वाचा सविस्तर
