Trump Tariff : आधीच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारतावर ५० टक्के कर लादला असताना आता भारतीय तांदळावर टॅरिफ लावण्याचे सूतोवाच त्यांनी केले आहे. कृषी क्षेत्रातील प्रतिनिधी आणि उच्च कॅबिनेट अधिकाऱ्यांसोबत व्हाईट हाऊसमध्ये गोलमेज बैठकीत त्यांनी हे विधान केले आहे.
अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी कृषी आयातीवर नव्याने टॅरिफ लावण्याचे संकेत दिलेत. ज्यात भारतीय तांदूळ आणि कॅनेडियन खतांचा समावेश असू शकतो. अमेरिकन शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी हे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यात स्वस्त दरातील परदेशी वस्तूंमुळे अमेरिकन उत्पादकांना नुकसान पोहचत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
यावेळी ट्रम्प यांनी स्थानिक शेतकऱ्यांसाठी १२ अब्ज डॉलर्सची सरकारी मदत जाहीर केली. यावेळी केनेडी राईस मिल्सच्या मालक मेरिल केनेडी यांनी ट्रम्प यांना सांगितले की देशाच्या दक्षिणेकडील भागातील भात उत्पादक शेतकरी संघर्ष करत आहेत. कारण इतर देश अमेरिकन बाजारपेठेत कमी दराने तांदूळ टाकत आहेत.
याबाबत ट्रम्प यांनी त्यांना विचारले की कोणते देश अमेरिकेत तांदूळ टाकत आहेत, तेव्हा राष्ट्रपतींच्या शेजारी बसलेल्या केनेडी यांनी उत्तर दिले की "भारत, थायलंड आणि अगदी चीनही प्यूर्टो रिकोला तांदूळ पाठवत आहेत. प्यूर्टो रिको एकेकाळी अमेरिकन तांदळाच्या सर्वात मोठ्या बाजारपेठांपैकी एक होता. आम्ही गेल्या अनेक वर्षांत प्यूर्टो रिकोला तांदूळ पाठवलेला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
भारताबद्दल एक प्रश्न विचारण्यात आला.
त्यानंतर केनेडी म्हणाले की हे अनेक वर्षांपासून सुरु आहे. ट्रम्प प्रशासनाने लादलेल्या शुल्कांचा परिणाम दिसून येत आहे, परंतु ते शुल्क अधिक कडक करण्याची आवश्यकता आहे. यावर ट्रम्प यांनी उत्तर दिले, मला समजते की तुम्हाला अधिक शुल्काची आवश्यकता आहे. त्यानंतर ट्रम्पने बेझंटकडे पाहिले आणि त्यांच्याकडे वळून विचारले, मला भारताबद्दल सांगा. भारताला हे करण्याची परवानगी आहे का? त्यांनी शुल्क भरावे. त्यांच्या तांदळावर काही सूट आहे का?
बेझंटने उत्तर दिले, नाही, आम्ही अजूनही त्यांच्याशी व्यापार करारावर काम करत आहोत. ट्रम्प म्हणाले, पण त्यांनी डंपिंग करू नये. म्हणजे, मी ते ऐकले आहे. मी ते इतरांकडून ऐकले आहे. ते असे करू शकत नाहीत.त्यानंतर केनेडी यांनी ट्रम्पला माहिती दिली की भारताविरुद्ध जागतिक व्यापार संघटनेत (WTO) खटला दाखल करण्यात आला आहे.
