नाशिक : पिंपळगाव बसवंत येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांची व्यापारीवर्गाकडून मोठ्या प्रमाणात लूट होत असल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. त्यामुळे बाजार समितीचे सभापती, उपसभापती आणि संचालकांनी तत्काळ या प्रकरणी लक्ष घालावे, अशी मागणी टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
नाशिक जिल्ह्यात टोमॅटोचा हंगाम सुरू असून जवळपास ८० टक्के शेतकरी माल पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी आणत आहेत. मात्र, व्यापारीवर्ग बाजार समितीत ज्या भावाने टोमॅटो खरेदी करतात, त्या भावाने पावत्या तयार करत नसल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात आला आहे.
जर बाजारात टोमॅटोच्या एका कॅरेटचा दर ३०० रुपये असेल, तर व्यापारी पावतीत तो दर २७० किंवा २८० रुपये दाखवतात. म्हणजेच प्रत्येक कॅरेटमागे ६० ते ७० रुपयांची कपात केली जाते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे आणि व्यापारीवर्ग मात्र या फसवणुकीतून नफा कमवत आहे. बाजार समितीच्या गाळ्यांवर माल खाली करताना व्यापारी आणि शेतकऱ्यांमध्ये दर कमी करण्यावरून वारंवार वादविवाद होत आहेत.
न्याय कुणाकडे मागायचा
त्यामुळे शेतकरी-व्यापारी संघर्ष टाळण्यासाठी बाजार समिती प्रशासनाने तातडीने या प्रकरणाकडे लक्ष देण्याची गरज शेतकरी सांगत आहेत. आर्थिक संकटात सापडलेला शेतकरीवर्ग सर्व बाजूंनी अडचणीत आहे. अशा स्थितीत जिवाची बाजी लावून शेतीमाल तयार करणारा शेतकरी जर विक्रीच्या ठिकाणीही लुटला जात असेल, तर त्याला न्याय कुणाकडे मागायचा, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.
लूटमारीला आळा बसावा
रोजच्या रोज टोमॅटो विक्रीसाठी बाजार समितीत जाणाऱ्या शेतकऱ्यांना व्यापारीवर्गाच्या विरोधात जाण्याचे धाडस होत नाही. त्यांना पुढील व्यवहारात अडचणी निर्माण होण्याची भीती आहे. त्यामुळे या लुटमारीला आळा बसावा, यासाठी पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती निफाडचे आमदार दिलीप बनकर यांनी हस्तक्षेप करून व्यापारी वर्गावर नियंत्रण आणावे, अशी मागणी शेतकरीवर्गाकडून होत आहे.