हरी मोकाशे
लातूर : एखादी वस्तू खराब निघाली की “पैसे दिलेत, चिंचोके नाही!” असे म्हणत नाराजी व्यक्त करणारे अनेकजण आता थक्क झाले आहेत.(Tamarind Seeds Market Price)
कारण ज्याला कधीच किंमत नव्हती, त्या चिंचोक्यालाच आज बाजारात सोन्याचा भाव मिळू लागला आहे. यंदाच्या मार्च महिन्यात लातूर बाजार समिती (Latur Agricultural Produce Market Committee) मध्ये चिंचोक्याला तब्बल ३,२०५ रुपये प्रति क्विंटल असा सर्वसाधारण उच्चांक भाव मिळाल्याने हा विषय चर्चेत आला आहे.(Tamarind Seeds Market Price)
दररोज मोठी आवक, तरीही दर मजबूत
लातूर बाजार समितीत जिल्हाभरातून शेतकरी चिंच आणि चिंचोका विक्रीसाठी आणतात. सध्या दररोज साधारण ५४० क्विंटलपर्यंत आवक होत असून, सध्याचा सर्वसाधारण दर २,७०० रुपये प्रति क्विंटल इतका आहे. मोठी आवक असूनही दर टिकून असल्याने शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळत आहे.
दरवर्षी वाढणारा भाव
मागील दोन वर्षांच्या तुलनेत चिंचोक्याच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याचे दिसून येते.
२०२३-२४ : सरासरी १,६०५ रुपये
२०२४-२५ : सरासरी २,६४५ रुपये
२०२५-२६ : सरासरी ३,२०५ रुपये
दरवर्षी किमान ५०० ते ७०० रुपयांची वाढ होत असल्याने चिंचोका हा आता नवा कॅश प्रॉडक्ट ठरत आहे.
गव्हालाही टक्कर
सध्या गव्हाला सुमारे २,८०० रुपये प्रति क्विंटल दर मिळत असताना चिंचोक्याचा भाव २,७०० रुपयांच्या आसपास आहे. त्यामुळे चिंचोक्याने थेट गव्हाला टक्कर दिल्याचे चित्र आहे.
देशभरातून वाढती मागणी
लातूरमधील चिंचोक्याला हैदराबाद, चेन्नई, अहिल्यानगर, पुणे, मुंबई येथे मोठी मागणी आहे. त्यामुळे येथील चिंचोका थेट मोठ्या शहरांच्या बाजारात पाठवला जात आहे.
उद्योगांसाठी महत्त्वाचा कच्चा माल
पूर्वी केवळ खेळण्यासाठी वापरले जाणारे चिंचोके आज विविध उद्योगांमध्ये महत्त्वाचे स्थान मिळवत आहेत
सुती कापडाला कडकपणा देण्यासाठी पावडर तयार केली जाते
'झायलोग्लुकन'मुळे कागद व डिंक उद्योगात बाइंडिंगसाठी वापर
विविध प्रक्रिया उद्योगांमध्ये कच्चा माल
खाद्य व औषधी उपयोगही महत्त्वाचे
चिंचोक्यांत प्रथिने, मॅग्नेशियम व फॉस्फरस मुबलक प्रमाणात असतात. भाजून किंवा पिठी करून त्याचा आहारात वापर केला जातो. आयुर्वेदातही हाडे मजबूत करण्यासाठी व सांधेदुखी कमी करण्यासाठी चिंचोक्याच्या चूर्णाचा उपयोग केला जातो.
मर्यादित आवक, वाढती मागणी
राज्यातील सुमारे ६६ बाजार समित्यांमध्येच चिंचोक्याची आवक होत असल्याने व्यापारीही मर्यादित आहेत. मात्र परराज्यातील वाढती मागणी लक्षात घेता दरात सातत्याने वाढ होत असल्याचे बाजार समिती प्रशासनाने सांगितले.
किंमत नाही म्हणून हिणवला जाणारा चिंचोका आज शेतकऱ्यांसाठी कमाईचा नवा पर्याय ठरत असून, बदलत्या बाजारपेठेचे हे जिवंत उदाहरण बनले आहे.
हे ही वाचा सविस्तर : Tamarind Market : अवकाळीच्या सावटात चिंचेचे दर तेजीत; जाणून घ्या कसा मिळतोय दर
