Soybean Market Update : नागपूर येथील कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी (३० ऑक्टोबर) सोयाबीनला दर्जानुसार प्रतिक्विंटल अवघा ३ हजार ३०० ते ४ हजार २५० रुपये इतका भाव मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.(Soybean Market Update)
शासनाने जाहीर केलेला हमीभाव ५ हजार १४० रुपये असताना प्रत्यक्षात मिळणारा दर शेकडो रुपयांनी कमी असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणितच कोलमडले आहे.(Soybean Market Update)
अतिवृष्टीने पिकांचे नुकसान, दर्जा निकृष्ट
या वर्षी अतिवृष्टीमुळे नागपूर जिल्ह्यातील सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. पावसामुळे शेतातील दाण्यांना डाग पडले असून, दर्जा निकृष्ट असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.याचा थेट परिणाम बाजारभावावर झाला असून, उच्च प्रतीच्या मालालादेखील अपेक्षित दर मिळत नाही.
भाव कोसळले; हंगाम तीन आठवड्यांत संपण्याची शक्यता
फक्त दोन दिवसांपूर्वी कळमन्यात सोयाबीनचा दर ४ हजार ४६० रुपये होता. परंतु त्यानंतर दर कोसळून ३ हजार ३०० ते ४ हजार २५० रुपयांपर्यंत खाली आला. सध्या दररोज सुमारे २ हजार ते २ हजार ५०० पोती आवक होत आहे.
मात्र, दर्जा खराब असल्याने भाव घसरले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे यंदा सोयाबीनचा हंगाम फक्त १५ ते २० दिवसांतच संपेल, अशी भीती व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
पूर्वी कळमन्यात दररोज ५ ते ६ हजार क्विंटल सोयाबीनची आवक होत होती.
काही वर्षांपूर्वी ही आवक १० हजार क्विंटलपर्यंत पोहोचली होती.
मात्र, यंदा आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे, असे बाजार समितीतील धान्य बाजार असोसिएशनचे पदाधिकारी कमलाकर घाटोळे यांनी सांगितले.
सरकारी खरेदी केंद्रे अद्याप सुरू नाहीत
राज्य शासनाने अद्याप सोयाबीन खरेदी केंद्रे सुरू केलेली नाहीत, त्यामुळे शेतकऱ्यांना खासगी व्यापाऱ्यांवर अवलंबून राहावे लागत आहे.
यामुळे व्यापाऱ्यांकडून मनमानी दर ठरवले जात असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे.
शेतकरी संघटनांनी सरकारकडे पुढे काय मागण्या केल्या
* हमीभावापेक्षा जास्त दर द्यावेत
* नुकसानीचे सर्वेक्षण करून भरपाई जाहीर करावी
* सरकारी खरेदी केंद्रे तातडीने सुरू करावीत
खर्च वाढला, उत्पादन कमी
यंदा सोयाबीनचे सरासरी उत्पादन अडीच ते तीन क्विंटल प्रति एकर इतकेच आले आहे. तर लागवड खर्च प्रति एकर १२ ते १५ हजार रुपये झाला आहे. या तुलनेत सध्याच्या बाजारभावात शेतकऱ्यांचा खर्चही निघत नाही.
दरवर्षी खते, मजुरी आणि इंधनाचे दर वाढत आहेत, पण सोयाबीनचा भाव मात्र स्थिर आहे. अशा परिस्थितीत अनेक शेतकरी पुढील हंगामात सोयाबीनची लागवड करायची की नाही, याबाबत संभ्रमात आहेत.
आमचं उत्पादन कमी आणि भावही अपुरे; खर्च वसूल करायलासुद्धा दर नाही. सरकारने तातडीने खरेदी सुरू करावी, नाहीतर पुढील हंगाम धोक्यात येईल, अशी भावना शेतकरी बांधवांनी व्यक्त केली.
शेतकऱ्यांची काय आहे मागणी
* हमीभावावर त्वरित सरकारी खरेदी सुरू करावी
* नुकसानीचे सर्वेक्षण करून भरपाई द्यावी
* निकृष्ट दर्जाच्या कारणावरून दरकपात थांबवावी
* शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चाच्या तुलनेत किमान लाभदायक दर निश्चित करावा
