सुधीर चेके पाटील
एका बाजूला शासनाने सोयाबीनसाठी हमीभाव जाहीर केला असला, तरी प्रत्यक्षात बाजारात त्याचा काहीच उपयोग होत नाहीये. खरीप हंगाम तोंडावर आलेला असतानाच या बियाण्यांच्या दरवाढीमुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. (Soybean Seed Prices)
बाजारात शेतकऱ्यांना सोयाबीनचा दर जेमतेम ४ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटल मिळतोय, तर दुसरीकडे त्याच सोयाबीनच्या बियाण्यासाठी तब्बल ७ हजार ८०० ते ११ हजार ८५० रुपये प्रतिक्विंटल मोजावे लागत आहेत.(Soybean Seed Prices)
यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांसमोर पुन्हा एकदा मोलाचा प्रश्न उभा राहिला आहे. विक्रीला सोयाबीन स्वस्तात, तर बियाणे दुप्पट दराने मिळत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
राज्य शासनाने यंदा सोयाबीनसाठी ४ हजार ८९२ रुपये प्रतिक्विंटल हमीभाव जाहीर केला असला, तरी प्रत्यक्ष बाजारात ४ हजार ५०० रुपयांहून अधिक दर मिळालाच नाही. या पार्श्वभूमीवर, आता बियाण्याचे दर ७ हजार ८०० ते ११ हजार ८५० रुपयांपर्यंत गेल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. (Soybean Seed Market)
बियाणाचे दर दुप्पट, खते मात्र स्थिर
शेतकऱ्यांना यंदा रासायनिक खतांच्या दरात काहीसा दिलासा मिळाला आहे, पण बियाण्यांच्या किमती मात्र, आवाक्याबाहेर गेल्या आहेत. सोयाबीन बियाणांची विक्री २२, २५ आणि ३० किलोच्या पॅकमध्ये होत असून, अनेक कंपन्यांचे दर बाजारभावाच्या तुलनेत दुप्पट अधिक आहेत.
बियाण्याची उपलब्धता
चिखली तालुक्यात सोयाबीन लागवडीसाठी ७३ हजार ३०० क्विंटल बियाण्याची गरज आहे. सध्या शेतकऱ्यांकडे ९५ हजार ७०७ क्विंटल साठा असून, बाजारातून आणखी १० हजार ५०० क्विंटल बियाणे उपलब्ध होणार आहे. एकूण मिळून १ लाख ०६ हजार २०७ क्विंटल बियाण्याची उपलब्धता असून, त्यामुळे ३२ हजार ९०७ क्विंटल बियाणे शिल्लक राहणार आहे.
घरच्या बियाण्याचा पर्याय फायद्याचा
बियाण्याच्या वाढत्या किमती पाहता, सुमारे ८०% शेतकरी आजही स्वतः चे बियाणे वापरण्याचा पर्याय निवडतात. यंदाही बियाण्याचा सरासरी दर ८ हजार रुपये गृहीत धरल्यास, घरचे बियाणे वापरल्यामुळे सुमारे ४७ कोटी रुपयांची बचत होण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चावर परिणाम
शेतकऱ्यांनी विक्रीसाठी सोयाबीन दिले तर त्याला मिळतोय साडेचार हजारांचा दर, पण त्याच पिकाच्या लागवडीसाठी बियाणे घ्यायचे म्हटले तर १० हजाराच्या आसपासचा खर्च. ही तफावत वर्षानुवर्षे कायम आहे आणि शेतकरी मात्र या आर्थिक तणावाखाली अडकलेले आहेत.
शेतकऱ्यांची मागणी
* सरकारने हमीभाव आणि बियाण्याच्या बाजारभावातील फरक लक्षात घेऊन बियाण्यांवर अनुदान, थेट मदत योजना किंवा दर नियंत्रण धोरण राबवावे, अशी शेतकऱ्यांची जोरदार मागणी आहे.
* शेतीमालाच्या बाजारभावात सातत्याने होणारी घसरण आणि बियाण्याचे वाढते दर यामुळे शेतकऱ्यांच्या नफ्यावर मोठा परिणाम होत आहे. खरीप हंगामात योग्य नियोजन आणि धोरणात्मक मदतीशिवाय शेतकऱ्यांसमोरचा आर्थिक अडसर वाढतच जाईल.
सोयाबीन बियाणांचे बाजारातील दर (प्रति पॅक)
कंपनी | वाण | पॅक (किलो) | दर (₹) |
---|---|---|---|
महाबीज | ३३५ | ३० | २१९० |
महाबीज | ६१२ | २२ | १७१६ |
बूस्टर सीड्स | ३३५ | ३० | २६५० |
बूस्टर सीड्स | ६१२ | २५ | २१५० |
अंकुर सीड्स | ३३५ | ३० | २६५० |
अंकुर सीड्स | प्रभाकर | २५ | २७०० |
ग्रीन गोल्ड | ३३४४ | २५ | २९६० |