Soybean Market : कष्टाने पिकवलेल्या सोयाबीनला खुल्या बाजारात अपेक्षित दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. (Soybean Market)
शासनाने हमीभावाने सोयाबीन खरेदी केंद्रे सुरू केल्याने चांगल्या दराच्या अपेक्षेने अनेक शेतकऱ्यांनी खुल्या बाजारात विक्री करण्याऐवजी माल साठवून ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. (Soybean Market)
याचा थेट परिणाम खामगावसह संपूर्ण जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील आवकीवर झाला असून, सध्या बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची आवक लक्षणीयरीत्या घटल्याचे चित्र दिसून येत आहे.(Soybean Market)
खुल्या बाजारातील दर हमीभावापेक्षा कमी
सध्या खुल्या बाजारात सोयाबीनला प्रतिक्विंटल ४ हजार ३०० ते ४ हजार ७०० रुपये दर मिळत आहे. मात्र शासनाने यंदा सोयाबीनसाठी ५ हजार ३२८ रुपये प्रतिक्विंटल असा आधारभूत हमीभाव जाहीर केला आहे.
खुल्या बाजारातील दर आणि हमीभाव यामध्ये प्रतिक्विंटल ६०० ते ८०० रुपयांची तफावत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. त्यामुळे घाम गाळून पिकवलेला शेतमाल कवडीमोल दराने विकण्याऐवजी शासकीय खरेदीची प्रतीक्षा करणे शेतकरी पसंत करत आहेत.
नाफेडमार्फत खरेदी, नोंदणी केंद्रांवर गर्दी
जिल्ह्यात नाफेडच्या माध्यमातून सोयाबीन खरेदी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासन व पणन विभागाच्या वतीने शेतकऱ्यांच्या सोयीसाठी विविध ठिकाणी नोंदणी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.
या केंद्रांवर नोंदणीसाठी शेतकऱ्यांची मोठी गर्दी होत असून, बहुतांश शेतकऱ्यांनी सोयाबीन साठवून ठेवले आहे. शासकीय खरेदी लवकर सुरू होईल, या अपेक्षेने शेतकरी प्रतीक्षेत आहेत.
तज्ज्ञांचा संयमाचा सल्ला
शेतमाल बाजारभाव तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना सोयाबीन विक्री करताना संयम बाळगण्याचा सल्ला दिला आहे. बाजारात आवक घटल्यास दर वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी शासकीय खरेदीसाठी नोंदणी केली आहे, त्यांनी घाईघाईने माल विक्री न करता शासकीय खरेदीची वाट पाहावी, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
बाजार समित्यांमधील आवकीचे चित्र
काही दिवसांपूर्वी सोयाबीनच्या आवकीने गजबजलेल्या बाजार समित्यांमध्ये सध्या आवक मंदावली आहे. आवक घटल्याने व्यापाऱ्यांच्या व्यवहारांवरही परिणाम झाला आहे.
सध्या केवळ अत्यंत आर्थिक अडचणीत असलेले शेतकरीच आपला माल विक्रीसाठी बाजार समितीत आणत असल्याचे दिसून येत आहे.
शेतकऱ्यांची मागणी
खुल्या बाजारातील दर अत्यंत कमी असल्याने उत्पादन खर्चही वसूल होणे कठीण झाले आहे. त्यामुळे शासनाने शासकीय खरेदी केंद्रांवरील खरेदी मर्यादा वाढवाव्यात, तसेच चुकारे तातडीने द्यावीत, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
अलीकडील सोयाबीन आवक (क्विंटलमध्ये)
११ डिसेंबर – ५,२३८
१२ डिसेंबर – ६,५२५
१३ डिसेंबर – ६,६९४
१६ डिसेंबर – ५,६३९
१७ डिसेंबर – ७,२९६
१८ डिसेंबर – ६,१४३
खुल्या बाजारातील दर अत्यंत कमी असून, त्यातून उत्पादन खर्चही वसूल होणे कठीण झाले आहे. शासनाने खरेदी केंद्रांनी मर्यादा वाढवाव्यात आणि चुकारे त्वरित करावीत, जेणेकरून शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळेल.-अंकुश साठे, शेतकरी, रा. कव्हळा, ता. चिखली
हे ही वाचा सविस्तर :Halad Market : वाशिम बाजार समितीत हळदीला उच्चांकी दर; मागणीचा मिळतोय फायदा
