Soybean Market : रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीत शुक्रवारी (२१ नोव्हेंबर) रोजी सोयाबीनची आवक अचानक वाढून ४ हजार क्विंटलपर्यंत पोहोचली आहे. त्यासोबतच दरातही सुधारणा होत ४ हजार ७५० रुपये प्रति क्विंटल इतका उच्च भाव नोंदवण्यात आला. (Soybean Market)
मागील काही वर्षांत सोयाबीनचे भाव ४ हजारांच्या पुढे न गेल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले होते. त्यामुळे यंदाची दरवाढ शेतकऱ्यांसाठी निश्चितच समाधानकारक ठरत आहे.(Soybean Market)
सोयाबीनला ७ हजार रु. दराची शेतकऱ्यांची मागणी
शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, उत्पादन खर्च, मजुरी, बियाणे व खतांचे वाढते दर लक्षात घेता सोयाबीनला किमान ७ हजार रुपये प्रति क्विंटलची हमीभावासमान किंमत मिळणे अत्यावश्यक आहे. परंतु, या बाबतीत शासनाची भूमिका अजूनही अस्पष्ट असल्याने असंतोष व्यक्त होत आहे.
कमी भावामुळे शेतकऱ्यांचा सोयाबीनकडे कल घटतोय
रिसोड तालुक्यात सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात लागवड क्षेत्र आहे. दरवर्षी लाखो क्विंटल आवक होते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून येणाऱ्या कमी दरामुळे अनेक शेतकरी सोयाबीनऐवजी पर्यायी पिकांकडे वळत आहेत.
उत्पादन खर्च व बाजारभावातील तफावत वाढत आहे
शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागत आहे
शासनाने त्वरित दरवाढ जाहीर करून शेतकऱ्यांना आधार द्यावा, अशी मागणी सतत होत आहे.
शेतकरीहिताचे निर्णय घेण्यावर आमचा भर आहे. सोयाबीनची आवक वाढली असून योग्य भाव मिळावा यासाठी आम्ही सतत प्रयत्न करतो. - विष्णुपंत भुतेकर, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, रिसोड
७ हजारपेक्षा कमी भाव नको
पिकांना योग्य भाव मिळावा यासाठी आम्ही प्रशासनाकडे सतत मागणी करतो. सोयाबीनला ७ हजार पेक्षा जास्त भाव मिळणे अत्यावश्यक आहे. - मंचकराव देशमुख, शेतकरी
सोयाबीनसाठी भाववाढ आमचे प्राधान्य आहे. शेतकऱ्यांसाठी उत्तम सुविधा उपलब्ध करून देण्याचा आम्ही सातत्याने प्रयत्न करतो. - विजय देशमुख, सचिव
सोयाबीनची आवक आणि दरात झालेली वाढ ही शेतकऱ्यांसाठी सकारात्मक बाब असली तरी उत्पादन खर्चाच्या तुलनेत आजचे दर अपुरे असल्याची एकमुखी मागणी सुरूच आहे. शासनाने हस्तक्षेप करून सोयाबीनला किमान ७ हजार रुपये दर देण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
हे ही वाचा सविस्तर : Soybean Kharedi : नाफेड नोंदणी सुरू… पण सोयाबीन खरेदी कुठे अडली? वाचा सविस्तर
