- भूषण सुके
नागपूर : एनसीसीएफने नागपूर जिल्ह्यातील केवळ नऊ खरेदी केंद्र सुरू करून किमान आधारभूत किंमत (एमएसपी)प्रमाणे साेयाबीन खरेदीला नाेव्हेंबर ऐवजी डिसेंबरमध्ये सुरुवात केली. या सर्व केंद्रांवर केवळ १,७८७ शेतकऱ्यांनी एमएसपी दराने साेयाबीन विकण्यासाठी नाेंदणी केली आहे. एनसीसीएफने जिल्ह्यात रविवार (दि. २८)पर्यंत केवळ ५,६१४ क्विंटल साेयाबीनची खरेदी केली आहे.
राज्य सरकारच्या पणन मंत्रालयाने एनसीसीएफला १५ नाेव्हेंबरपासून खरेदी केंद्र सुरू करण्याचे आदेश दिले हाेते. या केंद्रांवर साेयाबीन विकण्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाइन नाेंदणी करणे अनिवार्य केल्याने तसेच पुरेशा शेतकऱ्यांनी नाेंदणी न केल्याने एनसीसीएफने खरेदी केंद्र सुरू करण्यास दिरंगाई केली. नरखेड येथील केंद्र ६ डिसेंबर, काटाेल येथील केंद्र ७ डिसेंबर, उमरेड येथील केंद्र ९ डिसेंबर तर कळमेश्वर येथील केंद्र १९ डिसेंबरला सुरू करण्यात आले.
यावर्षी नागपूर जिल्ह्यात एकूण ७८ हजार ६०० हेक्टरमध्ये साेयाबीनची पेरणी करण्यात आली. अतिपाऊस, पावसाची दिरंगाई, मूळकुज आणि इतर राेग व किडींमुळे जिल्ह्यातील साेयाबीनचे उत्पादन घटले. ज्यांच्याकडे चांगल्या प्रतिच्या साेयाबीनचे उत्पादन झाले, त्यांनी ते एनसीसीएफ अथवा बाजारात विकण्याऐवजी बियाण्यासाठी विकण्याचा निर्णय घेतला.
ज्यांच्याकडील साेयाबीन पावसामुळे खराब झाले, त्यांनी ते मिळेल त्या भावात व्यापाऱ्यांना विकले. यावर्षी एनसीसीएफने नाेंदणी प्रक्रियेला उशिरा सुरुवात केली. त्यातच प्रतिएकर उत्पादकतेची अट घालण्यात आली. ही संपूर्ण प्रक्रिया त्रासदायक करण्यात आल्याने आपण व्यापाऱ्यांना साेयाबीन विकण्यास प्राधान्य दिल्याचे साेयाबीन उत्पादकांनी सांगितले.
खरेदी केंद्र व शेतकऱ्यांची नाेंदणी
केंद्र - शेतकरी संख्या
भिवापूर - ८०, कळमेश्वर - ५०, काटाेल - ८१४, सावनेर - ४७, उमरेड - ११६, रामटेक - ००, नरखेड - ६६८, चिपडी - ०५, वेलतूर - ०७
३८७ शेतकऱ्यांकडील साेयाबीनचे माेजमाप
जिल्ह्यातील नऊ खरेदी केंद्रांवर एकूण १,७८७ शेतकऱ्यांनी नाेंदणी केली असून, त्यातील ८१४ शेतकऱ्यांना एसएमएस पाठविण्यात आले. २८ डिसेंबरपर्यंत ८१४ पैकी ३८७ शेतकऱ्यांकडून ५,६१४ क्विंटल साेयाबीन एमएसपी दराने म्हणजे, प्रतिक्विंटल ५,३२८ रुपये दराने खरेदी करण्यात करण्यात आले. उर्वरित नाेंदणीकृत शेतकऱ्यांकडील साेयाबीनचे माेजमाप सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
नाेंदणीला मुदतवाढ
राज्य सरकारने साेयाबीन खरेदीसाठी अभिकर्ता म्हणून पणन महासंघाची नियुक्ती केली. संपूण राज्यात ३० ऑक्टाेबरपासून नाेंदणीला सुरुवात करण्यात आली हाेती. या नाेंदणीची अंतीम तारीख ३१ डिसेंबर निर्धारित केली हाेती. या काळात पुरेशा शेतकऱ्यांनी नाेंदणी न केल्याने साेमवारी (दि. २९) या नाेंदणीला मुदतवाढ देण्यात आली. त्यामुळे शेतकरी आता ३१ जानेवारी २०२६ पर्यंत ऑनलाइन नाेंदणी करू शकतील.
या खरेदी प्रक्रियेतून काेणताही साेयाबीन, उडीद व मूग उत्पादक शेतकरी वंचित राहू नये म्हणून ऑनलाइन नाेंदणीला प्रशासनाने एक महिन्याची मदतवाढ दिली आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी नाेंदणी करून साेयाबीन, उडीद व मूग एमएसपी दराने खरेदी केंद्रावर नेऊन विकावे.
- अजय बिसने, जिल्हा पणन अधिकारी, नागपूर
