Shetmal Bajarbhav : कृषीप्रधान अर्थव्यवस्था असलेल्या अमरावती जिल्ह्यात सध्या शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले आहे. शासन व प्रशासनाच्या निष्क्रीय भूमिकेमुळे व्यापाऱ्यांची दिवाळी तर शेतकऱ्यांचे दिवाळे अशी स्थिती निर्माण झाली आहे.(Shetmal Bajarbhav)
दिवाळीच्या काळात सोयाबीनसह इतर शेतमालाचे दर हमीभावापेक्षा दीड हजार रुपयांनी कोसळले आहेत. 'नाफेड' व 'सीसीआय'ची खरेदी अद्याप सुरू न झाल्याने खासगी व्यापाऱ्यांच्या मनमानीला ऊत आला आहे.(Shetmal Bajarbhav)
सोयाबीनचे भाव घसरले; शेतकऱ्यांची अपेक्षा फोल
गेल्या वर्षी सोयाबीनचा हमीभाव ४ हजार ८९२ रुपये क्विंटल होता. तरीही बाजारात वर्षभर सरासरी ३ हजार ५०० ते ४ हजार २०० रुपये दर मिळाला.
यंदा अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे उत्पादनात घट झाली. शेतकऱ्यांना वाटले दर वाढतील, पण उलट ३ हजार ५०० रुपयांवर सोयाबीन आले.
१३ ऑक्टोबर ते २७ ऑक्टोबर दरम्यान दरांमध्ये फक्त किरकोळ फरक दिसला, पण हमीभावापर्यंत पोहोचलेच नाहीत. व्यापाऱ्यांनी आर्द्रता व दाणा बारीक असल्याचे कारण देत भाव आणखी कमी केले.
सोयाबीन बाजारभाव (रु./क्विंटल)
१३ ऑक्टोबर : ३,४०० – ४०५०
१७ ऑक्टोबर : ३,६०० – ४,२६६
२५ ऑक्टोबर : ३,६०० – ४,१००
२७ ऑक्टोबर : ३,६५० – ४,१००
कापूस दरातही मोठी घसरण
'सीसीआय' कडून १५ ऑक्टोबरपासून खरेदी सुरू होईल, अशी घोषणा झाली होती. पण आता १२ दिवस उलटूनही एकही केंद्र सुरू झालेले नाही.
खासगी व्यापाऱ्यांकडे कापूस विक्रीसाठी गेलेल्या शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा दीड हजार रुपयांनी कमी दर मिळत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.
भाव नाही, मदत नाही, विमा नाही
पावसाने पीक घेतले, विम्याचा एक रुपया मिळाला नाही, नाफेड व सीसीआयची खरेदी सुरू नाही. व्यापाऱ्यांनी भाव पाडले. आम्ही शेती करतो की नुकसानच सहन करतो आहे. - अशोक आवारे, शेतकरी प्रतिनिधी
शासनाकडून आश्वासने, पण कृती नाही
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी शासनाने विशेष पॅकेज जाहीर केले असले तरी ते फक्त नुकसानग्रस्त भागापुरते मर्यादित आहे. इतर शेतकऱ्यांना अजून कोणतीही दिलासा योजना मिळालेली नाही.
खरेदी केंद्र सुरू न झाल्याने आणि विमा परतावा न मिळाल्याने शेतकऱ्यांना प्रतीक्षाच एकमेव पर्याय उरला आहे.
सोयाबीन व कापूस दरात १५०० रुपयांपर्यंत घसरण
नाफेड व सीसीआय खरेदी केंद्र बंद
अतिवृष्टीमुळे उत्पादन घट
पिकविम्याचा लाभ मिळालेला नाही
व्यापाऱ्यांचे फावले, शेतकरी आर्थिक अडचणीत
शासनाच्या विलंब, बाजारातील मनमानी आणि सततच्या पावसाने शेतकऱ्यांचे गणित बिघडले आहे. व्यापाऱ्यांची दिवाळी साजरी होत असताना, शेतकऱ्यांना दिवाळे निघण्याची वेळ आली आहे.
