गडचिरोली : १५ दिवसांपूर्वी धानाचा भाव (Dhan Market) प्रतिक्विंटल २ हजार २०० रुपयांवर पोहोचला होता. मात्र, पुन्हा भाव कमी होऊन तो दोन हजार ७०० रुपयांवर स्थिरावला आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडले आहेत. मार्च महिन्यात पीक कर्ज भरायचे असते. ते कसे भरावे, असा प्रश्न उभा ठाकला आहे.
जिल्ह्यात खरीप हंगामात (Kharip Season) प्रामुख्याने धानाची शेती केली जाते. चांगल्या दर्जाच्या धानाला खुल्या बाजारात हमीभावापेक्षा अधिक भाव मिळतो. त्यामुळे शेतकरी चांगल्या दर्जाचे धान खुल्या बाजारातच विकतात. मागील वर्षी धानाला तीन हजार रुपये क्विंटल भाव मिळाला होता. दरवर्षी वाढणाऱ्या खत, कीटनाशकांच्या किमती, वाढलेली मजुरी लक्षात घेता यावर्षी धानाला प्रती क्विंटल किमान ३ हजार ३०० रुपये भात अपेक्षित होता. मात्र, यावर्षी सुरुवातीपासूनच २ हजार ७०० रुपये एवढाच भाव मिळत आहे. कमी भात मिळत असल्याने उत्पादन खर्चही भरून निघणे कठीण झाले आहे.
मागील वर्षीपेक्षाही कमी भाव
मागील वर्षी धानाला सुमारे तीन हजार रुपये प्रती क्विंटल भाव मिळाला होता. दरवर्षी वाढलेला उत्पादन खर्च लक्षात घेता यावर्षी तीन हजार रुपयांपेक्षा अधिक भाव मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, प्रत्यक्षात कमी भाव मिळत आहे.
अजून प्रोत्साहनपर रक्कमही मिळाली नाही
धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति प्रोत्साहनपर रक्कम देण्याचे आश्वासन सरकारने दिले होते. मागील वर्षी मार्च महिन्यात प्रोत्साहनपर रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली होती. त्याच रकमेतून शेतकऱ्यांनी पीककर्ज भरले होते. यावर्षी मात्र शाासनाने अजूनही निर्णय घेतला नाही. प्रोत्साहन रक्कम मिळणार की नाही, अशी शंका उपस्थित केली जात आहे.
कर्जासाठी धानाची विक्री
बहूतांश शेतकरी पीक कर्ज घेतात, पीक कर्जाची रक्कम मार्च महिन्याच्या शेवटी भरावी लागते. आजपर्यंत भाव वाढेल या अपेक्षेने शेतकऱ्यांनी धान भरून ठेवले. मात्र, भावच वाढत नसल्याने काय करावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कर्ज भरायचे असल्याने भाव कमी असतानाही धानाची विक्री करावी लागत आहे. बऱ्याच दिवसांपासून धानाचे भाव २ हजार ७०० रुपये प्रति क्विंटलवर स्थिरायले आहेत. त्यामुळे पुढे भाब बाढतीलच याची शक्यता नाही.
पंधरा दिवसांपूर्वी धानाचा भाव प्रती क्विंटल २ हजार २०० रुपयांवर पोहोचला होता. मात्र, हा भाव अगदी काही दिवसच स्थिर राहिला. पुन्हा भाव २ हजार ७०० रुपयांवर स्थिरावला आहे.
- कुमदेव चौधरी, धान व्यापारी