Rice Market : महाराष्ट्रासह देशातील धान पट्ट्यात भात कापणीला सुरवात झाली आहे. लवकरच हे धान बाजारात येणार आहे. भाताला साधारण २ हजार रुपयापासून ते ३ हजार रुपयांपर्यंत दर मिळतो आहे. मात्र तांदळाच्या किंमतीमध्ये घसरण झाल्याचे चित्र आहे. सध्या तांदळाच्या किंमती काय आहेत, ते पाहुयात...
तांदळाच्या विविध प्रकारांपैकी प्रसिद्ध असलेल्या बासमती तांदळाच्या किमती घसरल्या आहेत. सलग दुसऱ्या वर्षी बासमती तांदळाच्या उत्पादकांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. या वर्षी बाजारात बासमती तांदळाची आवक वाढल्याने किमती घसरल्या आहेत.
'पुसा १५०९' या लोकप्रिय जातीची किंमत २ हजार ३०० ते २ हजार ५०० रुपये प्रति क्विंटलपर्यंत घसरली आहे. तर 'पुसा १७१८' कमाल ३ हजार ३०० रुपये प्रति क्विंटलला विकली जात आहे. गेल्या वर्षी या जातींमुळे शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ३ हजार ५०० ते ४ हजार रुपये मिळाले होते, तर २०२३ मध्ये किमती ४ हजार ७०० रुपयांवर पोहोचल्या होत्या.
६.६५ लाख मेट्रिक टन तांदळाची आवक
यंदा पंजाब राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे येथील भात पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. येथील शेतकरी सांगतात कि, पुसा १७१८ जातीला या वर्षी फक्त ३ हजार ३०० रुपये मिळत आहेत, गेल्या वर्षी ४ हजार रुपये आणि त्यापूर्वीच्या वर्षी ३ हजार ५०० रुपये मिळत होते. गुरुवारी तर पंजाब राज्यातील बाजारात ६.६५ लाख मेट्रिक टन बासमती तांदळाची आवक झाली होती, ज्यामध्ये एकट्या अमृतसरमध्ये ३.२४ लाख मेट्रिक टन बासमती तांदळाची आवक झाली होती.
मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातील तांदूळ
किंमती घसरण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातील स्वस्त, लांब तांदूळ, जो सध्याच्या जागतिक आर्थिक मंदीमुळे निर्यातदारांना अधिकाधिक हवा आहे. बासमती निर्यातदार रणजित सिंग जोसन यांनी स्पष्ट केले की या वर्षी या दोन्ही राज्यांसह राजस्थानमध्ये बासमतीचे उत्पादन २० टक्क्यांनी वाढले आहे, ज्यामुळे पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांना योग्य भाव मिळू शकला नाही.