नाशिक : दिवाळी तोंडावर आली असतानाही कांद्याचे दर मात्र गडगडलेलेच आहेत. मात्र या कवडीमोल भावातही शेतकरी कांदा मार्केटला घेऊन येत आहे. या दिवाळीत कांद्याच्या बाजारभावात काही बदल दिसून येतील का? देश तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर कांद्याची सद्यस्थिती काय आहे, हे समजून घेऊयात...
सध्या उन्हाळ कांद्याला केवळ ९०० ते ९७५ रुपये असा सर्वसाधारण भाव मिळत असल्याने कांदा उत्पादकांच्या डोळ्यात पाणी आहे. त्यात अजून भाव कमी झाले तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. दुसरीकडे परदेशातून भारताच्या कांद्याची मागणी कमी झाली आहे, ज्यामुळे निर्यातीचे प्रमाण मर्यादित होऊ शकते.
दुसरीकडे तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, महाराष्ट्रात खरीप कांद्याची लागवड नेहमीपेक्षा जास्त क्षेत्रात झाली आहे, ज्यामुळे उत्पादन वाढेल परंतु बाजारात जास्त पुरवठा असल्याने किमती मर्यादित राहू शकतात. त्यातच परदेशामधून भारतीय कांद्याला कमी मागणी आहे. परिणामी देशातील प्रमुख कांदा उत्पादक असलेल्या महाराष्ट्र व मध्य प्रदेशात ऐन दिवाळीत कांद्याचे भाव अजून कोसळण्याची शक्यता असल्याचे कांद्याचा प्रश्न पेटू शकतो.
भाव गडगडण्याची भीती
महाराष्ट्र, मध्य प्रदेशच्या शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात कांद्याचा साठा उपलब्ध आहे. यामुळे बाजारात कांद्याचा पुरवठा दुपटीने होण्याची शक्यता आहे. राजस्थान आणि गुजरातमधूनही खरीप हंगामातील कांद्याचा पुरवठा सुरू होण्याची अपेक्षा आहे. या सर्वच परिस्थितीत कांद्याचा बंपर स्टॉक देशभरात उपलब्ध होईल. परिणामी भाव कोसळू शकतात, असे कांदा निर्यातदार संघटनेचे उपाध्यक्ष विकास सिंग यांनी सांगितले.
खरीप पीक उशिरा येणार
उशिराचा खरीप कांद्रा पीक नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात बाजारात येण्याची अपेक्षा आहे, कर्नाटकमधून नोव्हेंबर अखेरपर्यंत पुरवठा सुरू राहण्याची शक्यता आहे. दुसरीकडे विकास सिंह यांनी केंद्र सरकारला कांदा बियाणे निर्यातीवर बंदी घालण्याची मागणी केली आहे.
त्यांनी स्पष्ट केले की बांगलादेश, श्रीलंका आणि इतर शेजारी देश भारतीय कांदा बियाण्यांचा वापर करून कांद्याचे उत्पादन करत आहेत, ज्यामुळे भारतीय शेतकऱ्यांशी थेट स्पर्धा निर्माण होत आहे.