नाशिक : पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीने गत आर्थिक वर्षात केवळ कांदा व टोमॅटो या शेतमालाची दोन हजार कोटी रुपयांची उलाढाल पिंपळगाव बाजार समितीत झाल्याची माहिती बाजार समिती सभापती आमदार दिलीप बनकर यांनी दिली.
शेतकरी, व्यापारी व कामगार यांच्या हितासाठी उभारलेले प्रशस्त व सुविधायुक्त मुख्य बाजार आवार, शेतकरी भवन, व्यापारी भवन, कामगार भवन, शेतमाल लिलाव शेड, स्वच्छतागृह, पाण्याची सोय, चोख वजन यामुळे शेतकरी व व्यापारी वर्गाचा विश्वास संपादन केला आहे. या बाजार समितीची वार्षिक सभा नुकतीच पार पडली.
आर्थिक व्यवहार पारदर्शक
गेल्या आर्थिक वर्षात बाजार समितीला सर्व शेतमालाच्या बाजार फीमधून २७कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. यातून १२ कोटी ७८ लाख रुपये पगारावर व विकासकामांसाठी खर्च करण्यात आले आहेत. यामधून १४ कोटी २३ लाख रुपये शिल्लक आहेत. यापूर्वी मिळालेल्या बाजार फीच्या उत्पन्नासह बाजार समितीकडे ७६ कोटी रुपयांची शिल्लक असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
दृष्टिक्षेपात उलाढाल
- कांदा आवक : ४४ लाख ६२ हजार १५० क्विंटल किंमत : ११५७ कोटी रुपये
- टोमॅटो आवक : १ कोटी ६९ लाख ६२ हजार ९०५ क्रेट किंमत : ९८४ कोटी १० लाख रुपये
'पिंपळगाव बाजार समितीने आता कांदा आवक वाढीसाठी मार्केटिंग करावे, तसेच डाळिंब मार्केट विकसित करून सर्व सुविधा निर्माण कराव्यात.
- सोहनलाल भंडारी, व्यापारी संचालक