सतीश बहुरूपी
राजुरा आणि परिसरातील संत्रा बाजारपेठेत व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची उघड लूट सुरू असल्याचा आरोप होत आहे. 'वायभार' आणि 'कोळशी' या नावाखाली व्यापारी दहा क्विंटल संत्र्यांवर तब्बल एक क्विंटल मोफत माल शेतकऱ्यांकडून घेतात. (Orange Market)
म्हणजेच १० टक्के ते २० टक्के सूट देऊन शेतकऱ्यांचेच उत्पन्न व्यापाऱ्यांच्या खिशात जात आहे. या अन्यायकारक प्रथेला अनेक वर्षांचा इतिहास असला तरी, बाजार समिती प्रशासन मात्र मौन बाळगून आहे.(Orange Market)
संत्रा उत्पादकांचा आक्रोश
वरूड, मोर्शी, राजुरा परिसरातील संत्रे देशभर प्रसिद्ध आहेत. वरूड तालुक्यात सुमारे २२ हजार हेक्टरवर संत्रा लागवड होते. एक संत्रा बाग फळधारणेपासून परिपक्वतेपर्यंत तब्बल ११ महिने जपावी लागते. त्या काळात कीटकनाशके, बुरशीनाशके, खतं, मजुरी या सर्वांचा मोठा खर्च शेतकऱ्यांच्या खांद्यावर असतो. परंतु, जेव्हा फळ विक्रीला येते तेव्हा व्यापाऱ्यांच्या मनमानी कपातीमुळे शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळत नाही.
सौद्यात दहा टक्के 'काट' म्हणजे थेट नुकसान
व्यापारी थेट बागेत जाऊन शेतकऱ्यांशी अलिखित करार करतात. या करारात 'वायभार' किंवा 'कोळशी'च्या नावाखाली दहा क्विंटल मालावर एक क्विंटल मोफत देण्याची सक्ती केली जाते. याशिवाय, काही व्यापारी लहान आकाराची फळे बाजूला काढून फेकतात. त्याचाही तोटा शेतकऱ्यांनाच सहन करावा लागतो.
बाजार समितीचे मौन का?
शेतकरी थेट बाजार समितीमध्ये माल विक्रीस नेतात, तरीही व्यापारी १०-१५ टक्के मोफत फळे घेतात, असा आरोप आहे. यावर बाजार समिती प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होत नाही. शेतकऱ्यांच्या मते, या प्रथेमुळे प्रतिटनाला किमान २ हजार ५०० ते ३ हजार रुपयांचा तोटा सहन करावा लागतो.
वायभाराच्या नावावर बेकायदेशीर कपात चालते, पण तक्रार नेमकी कुणाकडे करावी हेच समजत नाही असे अनेक शेतकऱ्यांचे मत आहे.
सध्याचे दर काय?
संत्रा हंगाम मध्यावर आला आहे. तरीही भाव अपेक्षेप्रमाणे वाढलेले नाहीत. सध्या बाजारात संत्र्यांचे दर २८ हजार ते ३५ हजार रुपये प्रती टन इतके आहेत. या दरात १० टक्के मोफत माल, वजन कपात आणि वाहतुकीचा खर्च वजा झाला की शेतकऱ्यांना नुसते नावालाच उत्पन्न उरते.
'लूट रोखा, कारवाई करा!'
शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांच्या या 'वायभार' प्रथेवर पायबंद घालण्याची मागणी केली आहे. बाजार समितीने दरनिश्चिती आणि व्यवहार प्रक्रियेत पारदर्शकता आणावी, अशी मागणीही होत आहे. अन्यथा आंदोलनाचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे.
संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचा घाम गाळून उभा राहिलेला सोन्याचा फळबाग उद्योग आज व्यापारी आणि प्रशासनाच्या संगनमताने होणाऱ्या लुटीचा बळी ठरत आहे. 'वायभार' या जुनाट प्रथेला जर आळा घालायचा असेल, तर प्रशासनाने तातडीने पुढाकार घेऊन शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, हीच वेळची गरज आहे.
दहा क्विंटल संत्र्यावर एक क्विंटल मोफत द्यावे लागते, आणि त्यातही वजन कपात केली जाते. हा प्रकार म्हणजे सरळ लूट आहे. - राजाभाऊ गुडधे, संत्रा उत्पादक शेतकरी (अमडापूर)