नाशिक :शेतीमाल विक्रीसाठी शेतकऱ्यांची फरफट होत असून त्यांना जवळपास ३० ते ४० किलोमीटरचे अंतर पार करून बाजारपेठेत माल पोहोचवावा लागतो. त्यात त्यांचा वेळ व पैसा खर्च होतो. त्यातच शेत रस्त्यांची अतिशय दैना झाली आहे.
त्यावर उपाय म्हणून मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातील शेतीमाल 'इ-नाम' योजनेतील (E Naam) फार्म गेट मॉडेलनुसार ऑनलाइन (farm Get Model) पद्धतीने विक्री करावा, अशी मागणी पणनमंत्री जयकुमार रावल यांच्याकडे करण्यात आली आहे.
कांद्यासह या धान्य विक्रीला फायदा
केंद्र शासनाच्या इनाम पोर्टलवर अकरा राज्यांमध्ये कांदा, धान, मका, कापूस, टोमॅटो या पिकांची विक्री होत आहे. शेतीमाल विक्रीचे हेच मॉडेल महाराष्ट्रातही सुरू करण्याची मागणी होत आहे.
असा बसतो शेतकऱ्यांना फटका
नाशिक आणि धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या कांदा चाळीत मोठ्या प्रमाणात कांदा साठवलेला आहे. कांदा शेतकऱ्यांना बाजार समितीच्या माध्यमातून विक्री करण्यासाठी साधारण पाच ते चाळीस किलोमीटर अंतर हा शेतमाल वाहून आणावा लागतो. अर्थात शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात वाहतूक खर्च करावा लागतो. शिवाय बाजार समितीमध्ये कांदा विक्रीसाठी आणताना ट्रॅक्टरमध्ये भरण्याची तसेच ट्रॅक्टरमधून बाहेरसाठी लागणाऱ्या मजुरांचा हमाली खर्च करावा लागतो.
इनाम प्रणालीमध्ये फार्म गेट मॉडेल विकसित झाल्यास शेतकऱ्यांसाठी सुलभ झाल्यास या शेतकऱ्यांचा शेतमाल विविध राज्यांतील व्यापारी थेट बोली लावून विकत घेतील. त्यामुळे फार्म गेट मॉडेलची अंमलबजावणी करण्याची मागणी कृषी भारती अटल अभिनव सेवा सहकारी संस्था फेडरेशनचे अध्यक्ष रवींद्र अमृतकर यांनी पणनमंत्री जयकुमार रावल यांच्याकडे केली आहे.
MahaDBT Farmer Lottery : महाडीबीटीवर कृषी यांत्रिकीकरण योजनेची यादी आली, आता कागदपत्रे अपलोड करा!