Online Rice Sale : भारतीय अन्न महामंडळाच्या महाराष्ट्र प्रादेशिक कार्यालयाने ई-लिलावाच्या माध्यमातून ऑगस्ट २०२५ च्या पहिल्या आठवड्यापासून खुल्या बाजार विक्री योजनेअंतर्गत (देशांतर्गत) तांदूळ विक्री सुरू केली आहे. तांदळाची बाजारातील उपलब्धता वाढवणे आणि वाढत्या किमतींवर नियंत्रण मिळवण्यात मदत करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
इच्छुक खरेदीदार भारतीय अन्न महामंडळाचे अधिकृत ई-लिलाव सेवा प्रदाता असलेल्या एम-जंक्शन सर्व्हिसेस लिमिटेड यांच्याकडे https://www.valuejunction.in/fci/ या पोर्टलद्वारे नोंदणी करू शकतात. सहभागासाठी नोंदणी करणाऱ्या पक्षकारांसाठी नावनोंदणीची प्रक्रिया ७२ तासांच्या आत पूर्ण केली जाते.
खुल्या बाजार विक्री योजनेनुसार, सामान्य विक्रीअंतर्गत २४ आणि २६ डिसेंबर रोजी नियोजित असलेल्या ई-लिलावासाठी महाराष्ट्र विभागातून एकूण १० हजार मेट्रिक टन तांदूळ उपलब्ध करून दिला जात आहे. व्यापारी, घाऊक खरेदीदार आणि तांदूळ उत्पादक हे या लिलावात सहभागी होण्यासाठी पात्र आसतील. किमान बोलीची मर्यादा १ मेट्रिक टन असून, कमाल मर्यादा प्रति बोलीदार ७ हजार मेट्रिक टन पेक्षा जास्त नसेल.
याव्यतिरिक्त, या ई-लिलावाद्वारे विशेष समर्पित वाहतूक (घाऊक विक्री) अंतर्गत देखील तांदूळ विक्रीसाठी उपलब्ध आहे. या प्रकारांतर्गत एकूण ५० हजार मेट्रिक टन तांदळासह ४० हजार मेट्रिक टन बिगर पोषण संवर्धित तांदूळ (१० टक्के तुकडा तांदूळ), २४ आणि २६ डिसेंबर रोजीच्या लिलावात उपलब्ध करून दिला जाईल. यात पंजाबमधील १० हजार मेट्रिक टन आणि आंध्र प्रदेशातील ३० हजार मेट्रिक टन तांदळाचा समावेश आहे.
तांदळाचे घाऊक ग्राहक आणि व्यापारी या वर्गवारीत सहभागी होऊ शकतील. विशेष वाहतुकीअंतर्गतच्या लिलावासाठी किमान बोलीची मर्यादा २५०० मेट्रिक टन असेल. यशस्वी बोलीदारांना साठ्याचा ताबा घेण्यासाठी त्यांच्या रेल्वे स्थानकाच्या गंतव्यस्थानाची माहिती प्रादेशिक महाव्यवस्थापकांना देणे गरजेचे असेल. खुल्या बाजार विक्री योजनेमुळे (देशांतर्गत) बाजारातील तांदळाचा पुरवठा वाढून, वाढत्या किमतींना आळा बसेल आणि ग्राहकांना दिलासा मिळू शकेल.
Read More : महिन्याला फक्त 210 रुपयांची गुंतवणूक अन् 5 हजारांची पेन्शन मिळवा, वाचा संपूर्ण माहिती
