Onion Market : फुलंब्री कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदाबाजारपेठेत शनिवारी (५ जुलै) रोजी तब्बल ७२५ क्विंटल कांद्याची खरेदी-विक्री झाली.
लिलावावेळी फुलंब्री मतदार संघाच्या आमदार आणि बाजार समितीच्या सभापती अनुराधा चव्हाण यांनी बाजारपेठेला भेट देऊन शेतकरी आणि व्यापाऱ्यांशी संवाद साधला.
शेतकऱ्यांना दिलासा देणारे आश्वासन
कांद्याच्या लिलावासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणावर बाजारपेठेत हजेरी लावत असून त्यांना त्यांच्या मालाला योग्य दर मिळावा, यासाठी बाजार समिती प्रयत्नशील असल्याचे आमदार चव्हाण यांनी सांगितले. त्यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले की, आपला कांदा इतरत्र न विकता फुलंब्री बाजारपेठेतच विक्रीसाठी आणा, येथे तुमच्या मालाला चांगला दर आणि सुविधा मिळतील.
१ जूनपासून लिलाव सुरू
फुलंब्री बाजार समितीत १ जूनपासून कांद्याच्या लिलावाला सुरुवात झाली असून दर शुक्रवारी लिलावाचे आयोजन होते. तालुक्यातील शेतकरी विक्रीसाठी तर जिल्हाभरातील व्यापारी खरेदीसाठी येथे हजेरी लावत आहेत. या आठवड्यातील लिलावात एकूण ७२५ क्विंटल कांद्याची उलाढाल झाली.
शेतकरी-व्यापाऱ्यांचा संवाद
लिलावाच्या दिवशी आमदार चव्हाण यांनी स्वत: हजेरी लावून बाजार समितीची कार्यपद्धती आणि सुविधा यांचा आढावा घेतला. शेतकरी व व्यापाऱ्यांच्या अडचणी जाणून घेत त्यावर त्वरित तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.
यावेळी संचालक जगन्नाथ दाढे, योगेश जाधव, श्रीराम म्हस्के, रोशन अवसरमल, सांडू जाधव, गोपाल वाघ, सचिव मनोज गोरे, तसेच वाल्मीक सराईकर, रणजीत कदम, विलास विटेकर, समाधान जाधव, प्रकाश प्रधान, लक्ष्मण क्षीरसागर, त्र्यंबक डकले, बाबा पटेल, शेतकरी व व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बाजारपेठेत अधिक सुविधा
आमदार चव्हाण यांनी सांगितले की, बाजार समिती शेतकऱ्यांसाठी आवश्यक त्या सुविधा पुरवण्यासाठी वचनबद्ध आहे. लिलाव प्रक्रिया अधिक पारदर्शक व सोयीची होण्यासाठी येत्या काळात आणखी सुधारणा करण्यात येणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
हे ही वाचा सविस्तर : Halad Market Update : हळद बाजार थंडावला; काय आहे कारण जाणून घ्या सविस्तर