नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत (Nashik Vegetable Market) अवकाळी पावसाने भाज्यांची आवक प्रचंड प्रमाणात घटली असली तरी धान्यापेक्षा भाजी बाजाराच्या माध्यमातून शेतकरी अधिक समृद्ध होत असल्याचे दिसून येते. गेल्या सहा महिन्यांत बाजार समितीत धान्यापेक्षा भाज्यांनी जास्तच जम बसविला आहे.
जून महिन्याचा विचार करता या महिन्यात एक लाख ६० हजार २८ क्विंटलची धान्याची तर दोन लाख ३४ हजार १४१ क्विंटल भाज्यांची आवक झाली. म्हणजे शेतकऱ्यांना धान्यापेक्षा भाज्याच जास्त पैसा मिळवून देत असल्याचे दिसून येते. नाशिक तालुक्यासह इगतपुरी, पेठ तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती आर्थिक घडामोडीचे केंद्र ठरत आहे.
नाशिकचा भाजीपाला मुंबई, दिल्ली, बिहार, गुजरातलामुंबईला रोज साधारण साडेतीन हजार टन भाजीपाल्याची गरज भासते. त्यातील दोन हजार शंभर टन भाजीपाला एकट्या नाशिकमार्गे मुंबईत पोहोचवला जात असल्याचे सहकार विभागाच्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. रोज तब्बल साडेतीनशे छोट्या-मोठ्या वाहनांतून भाजीपाला, फळे पुरविली जातात. तर गुजरात, बिहार व दिल्लीच्या बाजारपेठेतही नाशिक बाजार समितीतून २० टक्के भाजीपाला वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली.
भुसार माल परराज्यांतूनभुसार माल खरेदी-विक्रीतून नाशिक बाजार समितीत होणारी उलाढाल ५० टक्के परराज्यांतून येणाऱ्या भुसार मालावर अवलंबून आहे. कारण, भुसार माल व्यापारी डायरेक्ट खरेदी करून आणतो व येथे विकतो. प्रमुख असलेले धान्य तांदूळ आध्र प्रदेश तर गहू मध्य प्रदेशातून आणून विकला जातो. जिल्ह्यातील इगतपुरी, घोटी येथील शेतकरीदेखील तांदूळ आणतात.