- गणेश शेवरे
नाशिक : 'द्राक्षपंढरी' अशी ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यात द्राक्ष हंगाम (Nashik Grapes Season) सुरू झाला असून इतर राज्यातील व्यापारी, कामगार येथे मोठ्या संख्येने दाखल झाल्याने बाजारपेठ गजबजली आहे. या तीन महिन्यांत जिल्ह्यातून परदेशांमध्ये सात हजार ५६३ टन द्राक्षांची निर्यात झाली आहे. दरही समाधानकारक मिळत असल्याने द्राक्ष बागायतदार सुखावले आहेत.
नाशिक जिल्ह्यात द्राक्ष लागवडीखालील क्षेत्र सुमारे ५८ हजार ३६७ हेक्टर आहे. यात निफाड तालुक्यात २२ हजार हेक्टर, दिंडोरीत १५ हजार ७५८, नाशिकमध्ये ११ हजार ६७१, तर चांदवड तालुक्यात पाच हजार १४८ हेक्टर क्षेत्र आहे. याव्यतिरिक्त बागलाण व कळवणमध्ये द्राक्षाची लागवड होते. २०२३-२४ च्या हंगामातील निर्यातीची पार्श्वभूमी विचारात घेऊन कृषी विभागाने २०२४- २५ या आर्थिक वर्षात एक लाख ६० हजार टन निर्यातीचे उद्दिष्ट निश्चित केले आहे.
त्यापैकी युरोपियन देशांना एक हजार १४५ टन निर्यात झाली, तर इतर देशांमध्ये सहा हजार ४१८ टन निर्यात झाली आहे. यापूर्वी आंतरराज्यीय व्यापाऱ्यांनी शेकडो शेतकऱ्यांना चुना लावत कोट्यवधी रुपये बुडवले आहेत. चालू वर्षी अवकाळीचा काही प्रमाणात फटका बसला. मात्र, निर्यात होणाऱ्या द्राक्षाला चांगला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांना अवकाळीत झालेला तोटा भरून निघेल, अशी अपेक्षा आहे.
विविध द्राक्षांनी बाजार सजला
आशिया खंडातील द्राक्षांची सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपळगाव बसवंतमध्ये द्राक्ष हंगामाला जोरदार सुरुवात झाली आहे. हजारो व्यापारी येथे दाखल झाले आहेत. काळी, थॉमसन, माणिकचमन, गणेश, रेड ग्लोब, क्रीमसन, आरके, शदरकाळी, मामा जम्बो, पर्पल, फेल्म, सुधारक, कोलन अशा विविध जातींची द्राक्षे बाजारपेठेमध्ये उपलब्ध आहेत.
बाजार समितीने खरेदी करण्याची मागणी
दरवर्षी कोट्यवधी रुपयांची फसवणूक द्राक्ष उत्पादकांकडून व्यापारी बांधावर जाऊन मोठ्या प्रमाणात खरेदी करतात. मात्र, हे सर्व व्यवहार तोंडी होत असल्याने त्यातून उत्पादकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत असते. कोणताही लेखी पुरावा नसल्याने या व्यापाऱ्यांच्या विरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होत नाहीत. बाजार समिती जशी टोमॅटो, कांदे आणि भाजीपाला अडत्यांच्या माध्यमातून खरेदी करते तशीच द्राक्ष खरेदी केली तर शेतकऱ्यांची फसवणूक टळेल, अशी मागणी केली जात आहे.
या देशांमध्ये झाली निर्यात
आतापर्यंत बाहेरील देशांत तीन महिन्यांत सात हजार ५६३ टन द्राक्षांची निर्यात झाली आहे. त्यात युरोपियन देशांसह चीन, श्रीलंका, रशियाकडून भारतीय द्राक्षांना मागणी कायम आहे. द्राक्षाला प्रतिकिलो ८० ते १२० रुपये भाव मिळत असल्याने उत्पादकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
बाहेरचे व्यापारी येतात आणि शेतकऱ्यांचे पैसे न देता पळून जातात. त्यामुळे शेतकऱ्यांनी व्यापाऱ्याबरोबर व्यवहार करताना शहानिशा करावी.
- संदीप मोरे, स्थानिक द्राक्ष
एजंट 66 द्राक्ष खरेदीसाठी बाहेरच्या राज्यांतून व्यापारी आले आहेत. या व्यापाऱ्यांची माहिती पोलिस पाटील यांच्याकडे सादर करावी. शेतकऱ्यांनी सतर्क राहावे. - दुर्गेश तिवारी, पोलिस निरीक्षक, पिंपळगाव
शेतकऱ्यांनी मार्केटपेक्षा जास्त दर मिळत असल्याने परप्रांतातील व्यापाऱ्यांशी व्यवहार करताना सावधगिरी बाळगावी. फसवणूक न होण्यासाठी सतर्क राहावे. - कैलास भवर, द्राक्ष उत्पादक शेतकरी