- शेखर देसाई
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील द्राक्षांची (Nashik Grapes) गुणवत्ता ही चांगली असल्याने त्यांना परदेशामध्ये मोठी मागणी आहे. आतापर्यंत जिल्ह्यातून २८ हजार टन द्राक्षांची निर्यात झाली आहे. तर जवळपास २२४ शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून यंदा हवामानाची प्रतिकूल परिस्थिती असतानाही जिल्ह्यांमधून मोठ्या प्रमाणात द्राक्ष निर्यातीची (Nashik Grape Export) संधी आहे. मात्र, व्यापाऱ्यांकडून कमी दर मिळत असल्याने त्याचा शेतकरी वर्गाला फटका बसत आहे. त्यामुळे द्राक्ष निर्यातदार चिंतेत आहेत.
गोड, रसाळ द्राक्षांसाठी प्रसिद्ध असलेल्या नाशिक जिल्ह्यातून (Nashik Grape Farming) विविध देशांमध्ये या वर्षी २८ हजार २९६ टन द्राक्षांची आतापर्यंत निर्यात झाली आहे. सध्या द्राक्ष हंगामास पोषक वातावरण आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असताना, व्यापारी वर्गाकडून मात्र निर्यातक्षम द्राक्षाला कमी भाव मिळत असल्याचे शेतकरी वर्गाकडून सांगितले जाते. द्राक्षाची गुणवत्ता चांगली असून देखील कमी भावाने द्राक्ष निर्यात होत असल्याने शेतकरी वर्गाला आर्थिक फटका बसत आहे.
जिल्ह्याच्या अनेक भागांत फेब्रुवारीच्या दुसऱ्या पंधरवडचापासून द्राक्ष निर्यातीला वेग येणार आहे. यंदाच्या हंगामात राज्यातून द्राक्ष निर्यातीसाठी ४२ हजार २२४ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. यंदा हवामानाची प्रतिकूल परिस्थिती असतानाही जिल्ह्यातून मोठ्चा प्रमाणावर द्राक्ष निर्यातीची संधी आहे. बांगलादेशमध्ये नाशिक जिल्ह्याच्या द्राक्षांना प्रचंड मागणी आहे. तेथे चांगला भावही आहे, मात्र व्यापारी वर्गाकडून कुठलेही कारण नसताना द्राक्षांना कमी भाव दिला जात असल्याची उत्पादकांची तक्रार आहे.
द्राक्ष निर्यात वाढीसाठी आंतरराष्ट्रीय नियम, वाहतूक अनुदान आर्दीसाठी सरकारच्या दीर्घकालीन धोरणाची आवश्यकता आहे. त्यामुळे देशाला मिळणाऱ्या परकीय चलनातही मोठ्या प्रमाणावर वाढ होईल आणि शेतकऱ्यांना आपल्या मालाचे चांगले दर मिळतील. गेल्या दोन-तीन दिवसांत उन्हाचा कडाका वाढला असून, द्राक्षाची गोडी वाढत आहे. त्यामुळे युरोपीय देशातील निर्यातीचा वेग वाढणार आहे. आखाती देशांमध्ये तर डिसेंबरपासूनच निर्यात सुरू झालेली आहे.
मागील वर्षी इस्त्रायल-पॅलेस्टाइन युद्धाचा फटका बसला. यंदा द्राक्ष निर्यातीला पोषक वातावरण असतानाही व्यापाऱ्यांनी द्राक्षाचे दर कमी केल्याने शेतकऱ्यांना फटका बसत आहे. शेतकऱ्यांनी माल टप्याटप्प्याने विक्री करावा.
- कैलास भोसले, अध्यक्ष, द्राक्ष बागायतदार संघ
पर्यावरणाच्या बदलामुळे शेती व्यवसाय दिवसेंदिवस अवघड होत आहे. सिंचन सुविधा जरी असली, तरी रोज बदलत असलेल्या हवामानाला समर्थपणे तोंड देऊ शकेल, अशी कोणतीही शाश्वत व्यवस्था नाही. यामुळे शेती करणे जिकिरीचे झाले आहे.
- शेखर कदम, द्राक्ष उत्पादक शेतकरी