नाशिक : रमजान महिन्याच्या (Ramzan Eid) मुहूर्तावर फळांचा राजा आंबा नाशिकच्या (Nashik Amba Market) बाजारपेठेत दाखल झाला असून, मागील वर्षाच्या तुलनेने यंदा जवळपास १५ ते २० दिवस अगोदर आंब्याचे आगमन झाले आहे. हापूस आंबा १४०० ते १८०० रुपये डझन असून, लालबाग २५० ते ३०० रुपये किलो मिळतो आहे.
रमजान महिना असल्याने इतर फळांनाही (Fruit Market) मागणी वाढली असून, भावातही किलोमागे २० ते ३० रुपयांची वाढ झाली आहे. हंगामातील सर्वाधिक प्रतीक्षेत असलेल्या फळांच्या राजाची म्हणजेच आंब्याची आवक आता वाढण्यास सुरुवात झाली आहे. सध्या फक्त हापूस अन् लालबाग मिळतो. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात बदाम अन् केसर आंब्याचे आगमन होईल.
कोकणासह विविध राज्यांमधून हापूस (Hapus Mango), लालबाग आंब्याची मोठ्या प्रमाणावर आवक होत आहे. आंबा नुकताच बाजारात आला आहे. यंदा आंब्याचे भाव आवाक्यात राहण्याचा अंदाज आहे. हापूस आंब्याची पेटी विकली जात आहे. शनिवारी बाजार समितीत २४ टन आंब्यांची नोंद झाली असून २० मार्चनंतर आवक वाढण्याची शक्यता आहे. त्यानंतर ग्राहकांना देखील अधिकाधिक आंबा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
इतर बाजारातील दर
मागील तीन-चार दिवसांचे आंबा बाजार भाव पाहिले असता मुंबई फ्रुट मार्केटमध्ये लोकल आंब्याला क्विंटलमागे सरासरी 20 हजार रुपये तर हापूस आंब्याला जवळपास 57 हजार 500 रुपये असा दर मिळतो आहे. दुसरीकडे सोलापूर बाजारात हापूस आंब्याला नगामागे सरासरी 04 हजार रुपयांचा दर मिळतो आहे. छत्रपती संभाजी नगर बाजारात सर्वसाधारण आंब्याला सरासरी 9500 रुपयांचा दर मिळतो आहे. तर पुणे मोशी बाजारात लोकल आंब्याला सरासरी 21 हजार रुपयांपर्यंत दर मिळतो आहे.