नांदेड : गुरुवारी दुपारी अचानक झालेल्या अवकाळी पावसाने नांदेड शहरासह परिसरातील शेतकरी आणि व्यापाऱ्यांची मोठी धावपळ उडाली.(Nanded APMC)
वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे नवीन मोंढा बाजारात विक्रीसाठी आणलेले हजारो क्विंटल धान्य भिजल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले.(Nanded APMC)
आधीच उत्पादन खर्च, मजुरी आणि बाजारभावाच्या समस्यांनी त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांसाठी हा पाऊस आणखी एक मोठा धक्का ठरला आहे.(Nanded APMC)
अचानक बदललेल्या वातावरणाने उडाली तारांबळ
गुरुवारी दुपारी नवीन मोंढा बाजारात नियमित खरेदी-विक्रीचे व्यवहार सुरू होते. शेतकरी उन्हाळी ज्वारी, हळद आणि विविध पिकांचे धान्य विक्रीसाठी घेऊन बाजारात दाखल झाले होते.
काही ठिकाणी धान्याची चाळणी सुरू होती, तर व्यापारी बोली लावत होते. मात्र, अचानक वातावरणात बदल झाला आणि काही क्षणांतच काळे ढग दाटून आले.
यानंतर वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे बाजार परिसरात उभ्या असलेल्या ट्रॅक्टर, ट्रॉली आणि इतर वाहनांमध्ये भरलेले धान्य भिजू लागले. अचानक आलेल्या या पावसामुळे बाजारात एकच गोंधळ उडाला.
धान्य वाचवण्यासाठी शेतकरी-व्यापाऱ्यांची धावपळ
पाऊस सुरू होताच व्यापारी आणि शेतकऱ्यांनी तातडीने ताडपत्री टाकून धान्य झाकण्याचा प्रयत्न केला. काहींनी पोती सुरक्षित ठिकाणी हलवण्याचा प्रयत्न केला, तर अनेकांनी हातानेच धान्य सावरण्यास सुरुवात केली. मात्र, जोरदार पाऊस आणि वेगवान वाऱ्यामुळे प्रयत्न अपुरे ठरले.
बाजार परिसरातील रस्त्यांवर पाण्याचे लोट वाहू लागल्याने अनेक ठिकाणी धान्य पूर्णपणे भिजले. काही पोत्यांमध्येही पाणी शिरल्याने धान्य खराब होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
'डोळ्यादेखत कष्टाचे धान्य भिजले'
यंदा शेतीसाठी खत, बियाणे, औषधे आणि मजुरीचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी कष्टाने पिकवलेले आणि मळणी करून बाजारात आणलेले धान्य डोळ्यादेखत भिजताना पाहून अनेक शेतकरी भावूक झाले.
'रात्रंदिवस मेहनत करून पिकं तयार केली. बाजारात चांगला भाव मिळेल या आशेने धान्य आणलं, पण अवकाळी पावसाने सर्व स्वप्नांवर पाणी फेरलं,' अशी प्रतिक्रिया काही शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
प्रशासनाकडे नुकसानभरपाईची मागणी
पावसामुळे झालेल्या नुकसानीनंतर शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी प्रशासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे.
बाजार समिती परिसरात धान्य सुरक्षित ठेवण्यासाठी कायमस्वरूपी शेडची व्यवस्था करण्याची मागणीही जोर धरू लागली आहे.
पिकांनाही बसला फटका
अवकाळी पावसाचा परिणाम केवळ बाजारातील धान्यावरच झाला नाही, तर शेतातील उभ्या आणि काढणीस आलेल्या पिकांनाही मोठा फटका बसला आहे.
विशेषतः उन्हाळी ज्वारी, हळद आणि काही भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे.
हवामानातील सततच्या बदलांमुळे शेतकरी आधीच संकटात सापडला आहे. त्यातच वारंवार होणाऱ्या अवकाळी पावसामुळे आर्थिक गणित कोलमडत असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.
ठोस उपाययोजनांची गरज
हवामान बदलामुळे अवकाळी पावसाचे प्रमाण वाढत असून बाजार समित्यांमध्ये धान्य साठवणुकीसाठी आधुनिक सुविधा उभारणे अत्यावश्यक झाले आहे.
तसेच शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत आणि पीकविमा दाव्यांची जलद प्रक्रिया करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
हे ही वाचा सविस्तर : Halad Market Hingoli : अवकाळीचा घाला! हळदीसोबत शेतकऱ्यांची आशाही वाहून गेली
