NAFED Soybean Kharedi : चालू खरीप हंगामासाठी शासनाने सोयाबीनसाठी प्रतिक्विंटल ५ हजार ३२८ रुपये, मुगासाठी ८ हजार ७३८ रुपये, तर उडीदासाठी ७ हजार ८०० रुपये असा किमान आधारभूत दर (MSP) जाहीर केला आहे. (NAFED Soybean Kharedi)
मात्र, वाशिमसह अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांमध्ये मूग व उडीदाचा पेरा अत्यल्प असल्याने या पिकांची एकाही शेतकऱ्याची 'नाफेड'कडे ऑनलाइन नोंदणी झालेली नाही. परिणामी, यंदाच्या खरेदी हंगामात 'नाफेड'ला केवळ सोयाबीनचाच माल उपलब्ध होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.(NAFED Soybean Kharedi)
गेल्या काही वर्षांत शेतीतील उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली आहे. बियाणे, खत, कीडनाशके, मजुरी, वाहतूक तसेच इतर निविष्ठांचे दर प्रचंड वाढले असताना बाजार समित्यांमध्ये सोयाबीन, मूग व उडीदाला मिळणारे दर हे शासनाच्या हमीदराच्या तुलनेत कमी आहेत. त्यामुळे हमीदराचा लाभ मिळावा, या अपेक्षेने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात 'नाफेड'कडे नोंदणी करण्याचा मार्ग स्वीकारला आहे.(NAFED Soybean Kharedi)
८१ हजार ८५६ शेतकऱ्यांची नोंदणी, १.८८ लाख क्विंटल सोयाबीन
१२ डिसेंबरअखेर अमरावती विभागातील एकूण ८१ हजार ८५६ शेतकऱ्यांनी 'नाफेड'कडे ऑनलाइन नोंदणी केली असून, १ लाख ८८ हजार २७४ क्विंटल सोयाबीन खरेदीसाठी प्रस्तावित आहे. नोंदणीकृत शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्याने माल विक्रीसाठी आणण्याबाबतचे एसएमएस (SMS) पाठविण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती 'नाफेड'कडून देण्यात आली आहे.
जिल्हानिहाय नोंदणीचा तपशील
अकोला : २८,३४२ शेतकरी
वाशिम : २३,८८४ शेतकरी
बुलढाणा : १७,८८८ शेतकरी
अमरावती : १२,७१४ शेतकरी
यवतमाळ : ९,०२८ शेतकरी
मूग-उडीदाचा पेरा का घटला?
वाशिम जिल्ह्यासह संपूर्ण अमरावती विभागात सोयाबीनचा पेरा सातत्याने वाढत आहे. त्याच्या तुलनेत मूग व उडीद या कडधान्य पिकांचा पेरा नगण्य पातळीवर आला आहे. बदलते हवामान, उत्पादनातील अनिश्चितता, बाजारभावातील चढउतार आणि तुलनेने कमी नफा ही प्रमुख कारणे मानली जात आहेत.
सोयाबीनकडे वाढता कल
गेल्या काही वर्षांपासून वाशिम, अकोला, बुलढाणा, अमरावती आणि यवतमाळ या पाचही जिल्ह्यांमध्ये मूग व उडीदाच्या पेऱ्यात मोठी घट, तर सोयाबीनच्या पेऱ्यात व उत्पादकतेत लक्षणीय वाढ होत आहे. यंदाही हेच चित्र कायम राहिल्याने 'नाफेड'च्या खरेदी व्यवस्थेत सोयाबीनचाच दबदबा राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
वाशिम जिल्ह्यात सोयाबीनचाच सर्वाधिक पेरा आहे. त्याच्या तुलनेत मूग व उडीदाचा पेरा अत्यल्प असल्याने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या पिकांसाठी एकाही शेतकऱ्याची नोंदणी झालेली नाही. मात्र सोयाबीन उत्पादकांकडून 'नाफेड'ला चांगला प्रतिसाद मिळत आहे.- नत्थुजी कापसे, केंद्रचालक, नाफेड, वाशिम
