अनिलकुमार मेहेत्रे
पाचोडच्या मोसंबी मार्केटमध्ये बुधवारी आंबा बहार मोसंबीला चांगल्या प्रतीसाठी सर्वाधिक २० हजारांचा गोड दर मिळाला. मात्र मागणी कमी असल्याने आणि आवक वाढल्याने दरावर ताण आला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा उलाढाल तब्बल ३० लाखांनी कमी झाल्याने शेतकरी आणि व्यापारी दोघेही चिंतेत आहेत.(Mosambi Market)
पाचोड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मोसंबी मार्केटमध्ये बुधवारी आंबा बहार मोसंबीच्या लिलावाला सुरुवात झाली. (Mosambi Market)
चांगल्या प्रतीच्या मोसंबीला सर्वाधिक २० हजार रुपये प्रति टन भाव मिळाला असला, तरी शेतकऱ्यांच्या अपेक्षेप्रमाणे बाजारात उठाव नसल्याने काहीसा निराशेचा सूर होता. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा उलाढाल जवळपास ४० टक्क्यांनी घटली आहे.(Mosambi Market)
१०० टनांची आवक; २० हजारापर्यंत भाव
बुधवारी पाचोड मार्केटमध्ये शेतकऱ्यांनी विक्रीसाठी सुमारे १०० टन मोसंबी आणली होती. सकाळी ११ वाजता लिलावाला सुरुवात झाली. यावेळी मोसंबीला सर्वाधिक २० हजार रुपये प्रति टन, तर सर्वात कमी १५ हजार रुपये प्रति टन दर मिळाला. मात्र, मागील वर्षी याच काळात आंबा बहार मोसंबीला २० ते २५ हजार रुपये प्रति टन इतका दर मिळाला होता.
उलाढाल घटली
मागील वर्षी जुलै महिन्यात पाचोड मोसंबी मार्केटमध्ये जवळपास ७० लाख रुपयांची उलाढाल झाली होती. मात्र, यंदा आतापर्यंत केवळ ४० लाख रुपयांची उलाढाल झाली आहे. जुलै महिना संपायला अजून १५ दिवस बाकी आहेत, त्यामुळे व्यापारी पुढील आठवड्यांत मागणी वाढण्याची शक्यता व्यक्त करत आहेत.
मागणी कमी का?
व्यापारी शिवाजी भालसिंगे यांनी सांगितले की, पावसाळ्यात लोकांचा कल मोसंबीऐवजी केळी, सफरचंद, पेरू अशा फळांकडे अधिक असतो. थंड हवामानामुळे मोसंबीच्या रसाला मागणी कमी भासते. पावसाळ्यात फळं लवकर खराब होतात, त्यामुळे व्यापारीही खरेदीसाठी पुढे येत नाहीत.
मुंबई, पुणे, नाशिक, हैदराबाद अशा प्रमुख बाजारपेठांतही सध्या दर स्थिर असल्याने मागणी मंदावलेली आहे. तसेच, निर्यातही काही प्रमाणात कमी झाल्याने शेतकऱ्यांच्या मोसंबीला अपेक्षित दर मिळत नाही.