Join us

Mosambi Market : दिल्लीच्या पावसाचा थेट फटका; मोसंबी दरात तब्बल 'इतक्या' हजारांची घसरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 11:17 IST

Mosambi Market : मोसंबीचं सोनं झालं मातीमोल. पाचोडच्या बाजारात सध्या अशीच स्थिती आहे. काही दिवसांपूर्वी १८ हजार रुपये टनाने विकली जाणारी मोसंबी आता केवळ ८ हजारांवर येऊन ठेपली आहे. दिल्लीतील मुसळधार पावसामुळे मागणी थंडावली, व्यापारीही गायब, आणि शेतकऱ्यांच्या हातात राहिला फक्त नुकसानाचा हिशेब. (Mosambi Market)

Mosambi Market : दिल्लीमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा थेट फटका पाचोडच्या मोसंबी बाजारावर बसला आहे. मागणी घटल्याने मोसंबीच्या दरात तब्बल १० हजार रुपयांची घसरण झाली आहे. (Mosambi Market)

काही आठवड्यांपूर्वी १८ हजार रुपये प्रतिटन मिळणाऱ्या मोसंबीस आता केवळ ८ हजार ते १४ हजार रुपये प्रतिटन इतकाच दर मिळतो आहे. परिणामी, शेतकऱ्यांच्या पदरी आर्थिक तुटीचे संकट ओढावले आहे. (Mosambi Market)

दिल्लीच्या पावसामुळे मागणी घसरली

पाचोडची मोसंबी प्रामुख्याने दिल्लीमार्गे देशांतर्गत तसेच सातासमुद्रापार निर्यात केली जाते. मात्र, मागील तीन दिवसांपासून दिल्लीमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तेथील फळबाजारात मोसंबीची मागणी घटली आहे. परिणामी, पाचोड मार्केटमध्येही व्यापाऱ्यांची खरेदी कमी झाली असून दर घसरले आहेत.(Mosambi Market)

मोसंबीचे दर थेट ८ हजारांवर

मागील आठवड्यांपर्यंत मोसंबीला १४ ते १८ हजार रुपये प्रतिटन दर मिळत होता. मात्र, रविवारी (३ ऑगस्ट) झालेल्या लिलावात दर ८ हजार ते १४ हजार रुपये प्रतिटन इतकाच राहिला. पाचोड मार्केटमध्ये दररोज ४०० ते ५०० टन मोसंबीची आवक होत होती. पण सध्या ही आवक केवळ १०० ते १५० टनांपर्यंत खाली आली आहे.

उन्हाची झळ सोसून तयार केलेली मोसंबी ‘मोल’ न मिळाल्याने शेतकरी त्रस्त

शेतकऱ्यांनी उन्हाच्या झळा सहन करून कष्टाने आंबा बहार मोसंबीचे उत्पादन घेतले, मात्र, ती बाजारात विक्रीस आणली तरी पुरेसा भाव मिळत नाही. अनेक शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही वसूल होणार नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे.

दिल्लीमध्ये पाऊस सुरू असल्यामुळे तेथील बाजारात मोसंबीला उठावच नाही. मागणी नाही, तर खरेदीला व्यापारीही पुढे येत नाहीत. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे.- शिवाजी भालसिंगे, व्यापारी

बाजार सावरल्याशिवाय दिलासा नाही

व्यापारी आणि बाजार समितीच्या निरीक्षणानुसार, दिल्ली बाजार सावरल्याशिवाय मोसंबी दरात सुधारणा होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सध्या माल थांबवून ठेवावा की विक्री करून नुकसान पत्करावे, अशा द्विधा मन:स्थितीत आहेत.

पाचोडच्या मोसंबी उत्पादकांसाठी सध्या काळ कठीण आहे. निसर्ग आणि बाजारातील अनिश्चिततेचा फटका एकाच वेळी बसल्याने शेतकऱ्यांची आर्थिक घडी कोसळू नये यासाठी स्थानिक प्रशासन आणि कृषी विभागाने हस्तक्षेप करणे गरजेचे आहे.

हे ही वाचा सविस्तर : Mosambi Market : पाचोडमध्ये आंबा बहार मोसंबीचा बाजार मंदावला; जाणून घ्या सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रफळेबाजारमार्केट यार्डमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीशेतकरीदिल्लीपाऊस