नाशिक : ऐन दिवाळीत कोथिंबीर, हिरवी मिरची आणि ढोबळी मिरची शंभर रुपये भाव मिळाला. तर गावरान मेथीला तर संपूर्ण वर्षभरात प्रथमच ८० रूपये भाव रविवारी मिळाला. तर सोमवारी आवक वाढल्याने भावात २० रुपयांची घसरण झाली.
कोथिंबिरीने मात्र वर्षभरात दोनदा शंभरीपार केली. मागील महिन्यात झालेल्या अतिवृष्टीची झळ अजूनही भाजीबाजाराला बसत आहे. दिवाळीत मागणी वाढताच आवक जास्त असूनही भावात पाच ते पंधरा रुपयांची वाढ किलोमागे झाली. नाशिक कृषी उत्पन्न बाजार आठवडाभरापासून समितीत कोथिंबिरीच्या जुडीसाठी सरासरी दीडशे रुपयांचा दर मिळत आहे. तर किरकोळ बाजारात ९० ते १०० रुपयांत लहान जुडी मिळत आहे.
मेथीचे दर
दरम्यान १२ ऑक्टोंबर रोजी ६० रुपये, १३ ऑक्टोंबर रोजी ७० रुपये, १४ ऑक्टोंबर रोजी ८० रुपये, १५ ऑक्टोबर रोजी ५० रुपये, १६ ऑक्टोंबर रोजी ६० रुपये, १७ ऑक्टोबर रोजी ७० रुपये, १८ ऑक्टोबर रोजी ८० रुपये, १९ ऑक्टोंबर रोजी ८० रुपये तर २० ऑक्टोबर रोजी ६० रुपये दराने मेथीची जुडी विकली गेली.
कांदा खरेदीतून शेतकरी अन् ग्राहकांचा वांदा
किरकोळ बाजारात ३० रुपये किलोप्रमाणे कांद्याचा भाव आहे. व्यापारी मात्र एक हजार रुपये क्विंटल दराने कांदा खरेदी करीत आहे. व्यापाऱ्यांना दहा रुपये किलो दराने कांदा होलसेल बाजारात मिळत असताना किरकोळ बाजारात ग्राहकांना तो ३० रुपये किलोने खरेदी करावा लागतो. यात व्यापारी तुपाशी अन् शेतकरी अन् ग्राहक मात्र उपाशी अशी स्थिती आहे.