Melghat Sitafal Season : मेळघाटच्या निसर्गरम्य टेकड्यांवर उगवलेले सीताफळ आपल्या खास गोडसर चवीमुळे प्रसिद्ध आहे. दरवर्षी पावसाळा संपताच आणि हिवाळा सुरू होताच या फळाचा हंगाम सुरू होतो. (Melghat Sitafal Season)
सध्या परतवाडा शहरात मेळघाटातून आलेल्या सीताफळांनी बाजारपेठ गजबजली आहे. रोजगाराच्या संधी कमी असलेल्या आदिवासींना या हंगामी फळामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळतो. (Melghat Sitafal Season)
आदिवासी महिलांचा हंगामी धंदा
दररोज परतवाडा बाजारात मेळघाटातील महिला व आदिवासी कुटुंबे सीताफळ घेऊन येतात. विक्री पद्धतीही खास
बाटे (३ ते ४ सीताफळांचा ढीग) : ५० ते १०० रुपये
टोपली विक्री : १५० ते ३०० रुपये
सीताफळांच्या आकारमानावरून व टोपलीतील संख्येनुसार भाव ठरवला जातो. त्यामुळे ग्राहकांना परवडणाऱ्या दरात चविष्ट सीताफळे मिळतात, तर विक्रेत्यांनाही हंगामी उत्पन्न मिळते.
मेळघाटच्या सीताफळांची खासियत
चिखलदरा व अचलपूर तालुक्यातील गाविलगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेले बागलिंगा, बिहाली, वस्तपूर, हत्तीघाट, बेलखेडा, टेंब्रुसोंडा, परसापूर, देवगाव, बोराळा या भागातील सीताफळ बन विशेष प्रसिद्ध आहेत. नैसर्गिक वातावरणात रसायनविरहित उगवलेली ही फळे चवीला गोडसर आणि पोषणमूल्यांनी भरलेली असतात.
आरोग्यासाठी गुणकारी
* सीताफळ केवळ चवीसाठीच नाही तर आरोग्यासाठीही उपयुक्त आहे.
* पोटॅशियमयुक्त असल्यामुळे रक्तदाब नियंत्रणात ठेवते.
* कॅल्शियम व फॉस्फरसमुळे हाडे मजबूत होतात.
* पचनशक्ती सुधारते व शरीराला ऊर्जा मिळते.
महाराष्ट्रातील उत्पादन
सीताफळाचे उत्पादन महाराष्ट्रात सर्वाधिक घेतले जाते. त्यामुळे राज्यातील अनेक बाजारपेठांमध्ये स्थानिक शेतकरी व आदिवासींना सीताफळ विक्रीतून आर्थिक आधार मिळतो.
मेळघाटच्या जंगलात उगवलेले सीताफळ हा केवळ एक हंगामी गोडवा नाही तर स्थानिक आदिवासींच्या उपजीविकेचा आधार आहे. परतवाड्याच्या बाजारात सध्या हे फळ ग्राहकांची मने जिंकताना दिसत आहे.