नाशिक : गेल्या महिनाभरापासून मक्याच्या दरात झालेली घसरण व चालू आठवड्यात तालुकास्तरावर झालेली शासकीय हमीभाव खरेदी नोंदणी, आदी कारणांमुळे येथील स्व. निवृत्ती काका देवरे कृषी उत्पन्न बाजार समितीत मक्याच्या आवकेत निम्म्याने घट झाल्याने मका दरात ३०० रुपयांनी वाढ झाल्याचे दिसून आले.
मक्याला सुरुवातीला दोन हजार ते बावीसशे रुपयांपर्यंत बाजारभाव मिळाले होते. हेच बाजारभाव टिकून राहतील अशी अपेक्षा असतानाच मका आयातीच्या हालचालींमुळे तसेच इथेनॉलसाठी मकाखरेदीवरील अनुदान कमी झाल्याच्या अंदाजानुसार मका खरेदीदार कंपन्यांकडून मागणीत घट आल्याने मागील महिन्यात मक्याच्या दरात तब्बल चारशे ते पाचशे रुपयांची घसरण होत दर १२०० ते १६०० रुपयांपर्यंत खाली आले होते.
त्यामुळे शासनाने जाहीर केल्याप्रमाणे २४०० रुपये प्रतिक्विंटल याप्रमाणे आधारभूत हमीभावाने मका खरेदी केंद्रे सुरू करावे, यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उठाव केला होता. याची दखल घेत मागील शनिवारपासून तालुकास्तरावर मक्याच्या हमीभाव खरेदी नोंदणी सुरू करण्यात आली आहे.
सद्यःस्थितीत बाजारात मिळत असलेला बाजारभाव बघता नोंदणी झाल्यानंतर मका २४०० दराने विकला जाईल, या अपेक्षेने बहुतांश शेतकऱ्यांनी मकाविक्री थांबविल्याने याचा परिणाम आवकेवर झाला असून, येथील बाजार समितीत होणाऱ्या आवकेत निम्म्याहून अधिक प्रमाणात घट झाली आहे.
१९०० रुपयांचा सर्वाधिक दर
मागील आठवड्यात सर्वोच्च १६०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळणाऱ्या मक्याला चालू आठवड्यात दररोज ५० ते १०० रुपयांची वाढ होत शुक्रवार रोजी सर्वोच्च १९०० रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला आहे. बाजार आवारात १९० वाहनांमधून सुमारे चार हजार क्विंटल आवक झाल्याचा अंदाज असून बाजारभाव किमान १४०० रुपये, कमाल १९०० रुपये प्रतिक्विंटल मिळाले.
