नाशिक : सुमारे एक लाख क्विंटल मका विक्रीसाठी नोंदणी झालेली असताना अवघ्या पाच हजार क्विंटल खरेदीतच येथील शासकीय हमीभावाची मका खरेदी गुंडाळण्यात आली आहे. केंद्राने राज्याला, राज्याने जिल्ह्याला व जिल्ह्यातून येवल्याला खरेदीचे दिलेले उद्दिष्ट पूर्ण झाल्यामुळे खरेदी ठप्प झाल्याचे सांगितले जात आहे.
यामुळे अनेक मका उत्पादक शेतकरी मका विक्रीपासून वंचित राहिले असून, त्यांना आता खासगी व्यापाऱ्याकडे मका विकावी लागणार आहे. हे उद्दिष्ट वाढवून देण्याची मागणी शेतकऱ्यांसह लोकप्रतिनिधींकडून होत आहे.
खासगी बाजाराच्या तुलनेत हमीभावाचा दर ५०० ते ७०० रुपये जास्त आहे. सध्या खासगी बाजारात १५०० ते १८०० रुपयांचा दर असून, हमीभावाचा दर मात्र २४०० रुपयांचा आहे. तब्बल २२०० शेतकऱ्यांनी येवल्यात नावनोंदणी केली आहे.
उद्दिष्ट वाढीची प्रतीक्षा
राज्याला ३ लाख १० हजार टन मका खरेदीचे उद्दिष्ट दिले असून, त्यातून अवघी ४५ हजार टन खरेदी जिल्ह्याच्या वाट्याला आली आहे. जिल्ह्यात २२ ठिकाणी खरेदी सुरू असल्याने येवल्यासाठी फक्त पाच हजार क्विंटल खरेदी झाली आहे. मुळात येवल्याला एक लाख क्विंटल खरेदीचे उद्दिष्ट दिले तरी कमी पडेल. त्यामुळे पाच हजारांची खरेदी केव्हाच पूर्ण झाली आहे. त्यातही खरेदी-विक्री संघाने उद्दिष्टांपेक्षा जास्त खरेदी करून ठेवली असल्याने आता उद्दिष्ट वाढीची प्रतीक्षा आहे.
आधारभूत धान्य खरेदी योजनेंतर्गत मका खरेदीसाठी तालुक्यातील २२०० शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून, सुमारे एक लाख क्विंटल मका खरेदी होईल. मात्र, अवघे पाच हजार क्विंटलचेच उद्दिष्ट असल्याने ते पूर्ण झाल्याने मका खरेदी बंद आहे. यासंदर्भात आम्ही वरिष्ठांकडे पत्रव्यवहार केला आहे. खरेदीचे उद्दिष्ट वाढून मिळताच मका खरेदी सुरू होईल.
- सुनील देशमुख, अध्यक्ष, येवला तालुका खरेदी-विक्री संघ
